२७ व्या सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीचं सत्र अद्यापही सुरुच आहे. अर्जेंटींनाविरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर भारताने इंग्लंडविरुद्ध विजयाची संधी गमावली होती. यानंतर जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यातही भारताला पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर ४-२ ने मात करत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे.

जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा हॉकी संघ हा अव्वल संघांमधघ्ये मोडतो. त्यामुळे आजचा सामना भारतीय संघासाठी सोपा जाणार नाही हा अंदाज सर्वांनी वर्तवला होता. मात्र पहिल्या सत्रात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चांगली टक्कर दिली. तलविंदर सिंह, सुमीत, रमणदीप सिंह यांनी रचलेल्या काही चांगल्या चालींमुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आक्रमण करण्याची फारशी संधी मिळाली नाही. भारताच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंना बचावफळीनेही उत्तम साथ दिल्यामुळे पहिल्या सत्रात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही.

मात्र दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपल्या खेळाची दिशा बदलली. २५ यार्ड सर्कल क्षेत्रात आक्रमक चाली रचत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतीय गोलपोस्टवर लागोपाठ हल्ले करायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या या आक्रमक खेळाला तोंड देणं भारतीय खेळाडूंना जमत नव्हतं. यातच मार्क नोवेल्सने २८ व्या मिनीटाला गोल करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्राच्या अखेरीस बसलेल्या या धक्क्यातून भारतीय संघ सावरुच शकला नाही.

मध्यांतरानंतरच्या खेळावरही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आपलं वर्चस्व गाजवलं. त्यातच पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याची संधी भारतीय खेळाडूंनी दवडल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची सामन्यातली बाजू आणखीनच वरचढ झाली. यानंतर ३५ व्या मिनीटाला ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन झलेस्कीने दुसरा गोल करत कांगारुंची आघाडी वाढवून दिली. यानंतर ऑस्ट्रेलियाने लागोपाठ ४१ व्या डॅनिअल बेलमार्फत आणि ४३ व्या मिनीटाला ब्लॅक गोव्हर्सच्या मार्फत गोल करुन भारताला सामन्यात बॅकफूटलला ढकललं. संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडू हे गोंधळलेल्या अवस्थेत पहायला मिळाले. चौथ्या सत्रात भारताकडून रमणदीप सिंहने ५२ व्या आणि ५३ व्या मिनीटाला गोल करत आपलं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत संधी भारतीय संघाच्या हातून निसटली होती. या पराभवासह भारताच्या अंतिम फेरीत पोहचण्याच्या आशा कमी झाल्या असून उद्या भारताचा सामना यजमान मलेशियाविरुद्ध होणार आहे.

Story img Loader