प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या भारतीय हॉकी संघाने, सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात आशियाई खेळांचं विजेतेपद पटकावणाऱ्या जपानला भारताने 2-0 ने हरवलं आहे.

मुख्य प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघावर या सामन्यात चांगलाच दबाव होता. त्यातच जपानने आशियाई खेळांमध्ये दादा संघांना पराभवाचं पाणी पाजलं होतं. मात्र प्रत्यक्ष सामन्यात भारताने सामन्यावर चांगलं वर्चस्व राखलं. वरुण कुमारने दुसऱ्या सत्रात 24 व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नवर गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

मध्यांतरानंतर जपानने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय संघाने जपानचे हे प्रयत्न हाणून पाडले. वरुण कुमारला मध्यांतरानंतरही पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याची संधी आली होती, मात्र जपानने यावेळी भक्कम बचाव केला. अखेर मनदीपने रचलेल्या चालीवर सिमरनजीत सिंहने जपानी गोलकिपर योशिकावाला चकवत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर जपानचा संघ सामन्यात पुनरागमन करु शकला नाही आणि भारताने सामन्यात 2-0 ने बाजी मारली. या स्पर्धेत रविवारी भारताचा सामना दक्षिण कोरियाविरुद्ध होणार आहे.

Story img Loader