कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश; फेडररविरुद्ध सलामीचा सामना

भारताचा प्रतिभावान उदयोन्मुख टेनिसपटू सुमित नागलने शनिवारी स्वप्नवत कामगिरीची नोंद करताना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत धडक मारली. मंगळवारी रंगणाऱ्या पहिल्या फेरीच्या सामन्यात त्याच्यापुढे विश्वातील सवरेत्कृष्ट टेनिसपटू स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररचे आव्हान असणार आहे.

२२ वर्षीय सुमितने २ तास व २७ मिनिटे रंगलेल्या पात्रता फेरीतील अखेरच्या लढतीत ब्राझीलच्या जोआओ मेनेझेस ५-७, ६-४, ६-३ असे पिछाडीवरून सरशी साधत पराभूत केले. जागतिक क्रमवारीत १९०व्या स्थानी असलेल्या सुमितसमोर तिसऱ्या मानांकित फेडररचे आव्हान उभे ठाकणार असल्याने या सामन्याची भारतीय टेनिसप्रेमींना उत्सुकता लागली आहे.

सुमितव्यतिरिक्त प्रज्ञेश गुणेश्वरननेसुद्धा मुख्य फेरीतील स्थान निश्चित केले असून त्याच्यापुढे पहिल्या लढतीत रशियाच्या डॅनिएल मेद्वेदेवचे आव्हान असणार आहे. स्पर्धेच्या मुख्य फेरीला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे.

  • चालू दशकातील कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील मुख्य फेरीत प्रवेश करणारा सुमित हा भारताचा पाचवा टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी, सोमदेव देववर्मन, युकी भांब्री, साकेत मायनेनी आणि प्रज्ञेश गुणेश्वरन यांनी ही किमया साधली आहे.
  • तब्बल २१ वर्षांनी प्रथमच भारताच्या दोन खेळाडूंनी ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळवले आहे. यापूर्वी १९९८मध्ये लिएण्डर पेस व महेश भूपती या मातब्बरांनी हा पराक्रम केला होता.

कारकीर्दीतील अविस्मरणीय असा हा क्षण आहे. फेडररविरुद्ध किमान एक तरी सामना खेळण्याची संधी मिळावी, अशी माझी इच्छा होती. तो टेनिसचा देव असून त्याच्याविरुद्ध खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. – सुमित नागल, भारताचा टेनिसपटू

 

Story img Loader