मेलबर्न : ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत ऐतिहासिक विजयाची नोंद करणाऱ्या भारताच्या सुमित नागलचे आव्हान दुसऱ्या फेरीत मात्र संपुष्टात आले. झुंजार खेळानंतरही नागलला चीनच्या जुनचेंग शांगकडून पराभव पत्करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागलने पहिल्या फेरीतील सामन्यात मानांकित खेळाडूला पराभूत करण्याची किमया साधली होती. गुरुवारी दुसऱ्या फेरीच्या सामन्यातही त्याने पहिला सेट जिंकला होता. मात्र, त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या १८ वर्षीय शांगने नागलवर ६-२, ३-६, ५-७, ४-६ अशी मात केली.

या पराभवानंतरही नागलसाठी ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील प्रवास संस्मरणीय राहिला. त्याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवले आणि नंतर जागतिक क्रमवारीत २७व्या स्थानी असलेल्या अलेक्झांडर बुब्लिकला नमवले. नागलला या स्पर्धेतील कामगिरीसाठी १ लाख ८० हजार ऑस्ट्रेलियन डॉलर (जवळपास ९५ लाख रुपये) मिळणार आहेत.

हेही वाचा >>> IND vs AFG : ‘टीम इंडियाने तक्रार करायला नको होती कारण…’, वादग्रस्त ओव्हरथ्रोवर आकाश चोप्राने दिली प्रतिक्रिया

तारांकितांना पराभवाचे धक्के

ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत गुरुवारी काही धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. महिलांमध्ये तिसऱ्या मानांकित एलिना रायबाकिना आणि पाचव्या मानांकित जेसिका पेगुला यांना, तर पुरुषांमध्ये आठव्या मानांकित होल्गर रुनला पराभवाचा सामना करावा लागला. आर्थर काझाउक्सने रूनला ७-६ (७-४), ६-४, ४-६, ६-३ असे पराभूत केले. महिलांमध्ये क्लॅरा बुरेलने पेगुलावर ६-४, ६-२ अशी, तर अ‍ॅना ब्लिन्कोव्हाने रायबाकिनावर ६-४, ४-६, ७-६ (२२-२०) अशी मात केली.

बोपण्णा-एब्डेनची आगेकूच

पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा साथीदार मॅथ्यू एब्डेनने पहिल्या सेटमध्ये ०-५ अशा पिछाडीनंतर पुनरागमन करताना जेम्स डकवर्थ व मार्क पोलमँस जोडीला ७-६ (७-५), ४-६, ७-६ (१०-२) असे पराभूत केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sumit nagal s australian open journey ends in second round after defeat by juncheng zws