लंडन ऑलिम्पिकसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविणाऱ्या हरयाणाच्या सुमीत संगवानने अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेवरही जेतेपदाची मोहोर उमटवली. नागपूरमधील विभागीय क्रीडा संकुलात रंगलेल्या आणि तब्बल ३२५ बॉक्सर्सचा सहभाग लाभलेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुमीतने लाइट हेवीवेट गटात सुवर्णपदक मिळवण्याबरोबरच स्पर्धेतील सर्वोत्तम बॉक्सर होण्याचा मान पटकावला. कर्नाटकचा एल. प्रसाद देशातील सर्वोत्तम उभरता तर मणिपूरचा एम. थॉमस सर्वात आव्हानात्मक बॉक्सर ठरला.
अनेक स्पर्धाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे सुमीत आत्मविश्वासाने रिंगणात उतरला होता. पण आपल्याला बलाढय़ प्रतिस्पध्र्याशी दोन हात करायचे आहेत, यामुळे हिमाचल प्रदेशच्या गीतानंदने आधीच हार मानली होती. सुमीतने उंचीचा पुरेपूर फायदा उठवत गीतानंदला ठोसे लगावण्यास सुरुवात केली. गीतानंदकडून कोणतेच प्रत्युत्तर मिळत नव्हते. अखेर पंचांनी लढत थांबवून सुमीतला विजयी घोषित केले. आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेघालयच्या मनप्रीत सिंगने हेवीवेट गटात सिक्कीमच्या महेंद्र नेगीवर वर्चस्व गाजवले. मनप्रीतने ही लढत ३-० अशी जिंकून सुवर्णपदकावर नाव कोरले. राष्ट्रकुल स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या रेल्वेच्या अमनदीप सिंगने ओदिशाच्या योगिंद्रचा पाडाव केला. योगिंद्रने अमनदीपला कडवी लढत दिली. अखेर अमनदीपने २-१ अशी लढत जिंकून सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या हरयाणाच्या सुनीलला पश्चिम बंगालच्या असद आसिफने जेतेपदासाठी झुंजवले. अखेर ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेल्या सुनीलने सर्वागसुंदर खेळाचे प्रदर्शन करत २-१ असा विजय मिळवून पुन्हा एकदा बँटमवेट गटात राष्ट्रीय विजेता होण्याचा मान पटकावला. हरयाणाने ४० गुणांसह सांघिक जेतेपदावर नाव कोरले. सेनादलाने २८ गुणांनिशी उपविजेतेपद पटकावले.

Story img Loader