‘फिफा’ कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी चाहत्यांना दोन महत्त्वपूर्ण सामन्यांची पर्वणी अनुभवता येणार आहे. विश्वचषक आणि युरोपियन चषक विजेत्या स्पेनचा मुकाबला बलाढय़ उरुग्वेशी होणार असून मेक्सिको आणि इटली यांच्यातील रंगतदार लढतीचा मनमुराद आनंद चाहत्यांना घेता येणार आहे.
इटली संघ ४३ वर्षांनंतर मेक्सिकोवर विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे. मात्र मेक्सिकोचे प्रशिक्षक जोस मॅन्युएल डे ला टोरे यांनी संघात बरेच बदल करण्याचे ठरवले आहे. जियोवानी डोस सान्तोस याला अल्डो डे नेग्रिस याच्या जागी संधी मिळणार आहे. तसेच गेराडरे टोराडो १४२वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी उत्सुक आहे. विश्वचषक पात्रता फेरीच्या चेक प्रजासत्ताकविरुद्धच्या सामन्यात लाल कार्ड मिळाल्यानंतरही मारियो बालोटेली इटली संघातर्फे खेळण्यासाठी सज्ज झाला
आहे. मात्र त्याचा सहकारी स्टीफन अल शारावी याला घोटय़ाच्या दुखापतीने ग्रासले आहे.
गेल्या सहा सामन्यांत स्पेनकडून एकदाही पराभव पत्करावा न लागल्यामुळे उरुग्वे संघ स्पेनविरुद्ध विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र गेल्या २२ सामन्यात एकही हार न पत्करणारा स्पेन संघ उरुग्वेविरुद्ध तीन गुण मिळवण्यासाठी उत्सुक आहे. झाबी अलोन्सो दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नसला तरी स्पेन संघात जावी मार्टिनेझ आणि सान्ती काझोर्ला या रिअल माद्रिद संघातील खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. उरुग्वेची मदार लुइस सुआरेझ, एडिन्सन कावानी आणि दिएगो फोर्लान यांच्यावर आहे.
सामन्याची वेळ : रात्री १२.३० (मेक्सिको वि. इटली)
रात्री ३.३० वा. (स्पेन वि. उरुग्वे)
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा