अन्वय सावंत
‘यत्र प्रतिभा अवसर प्रप्नोती’ म्हणजेच जिथे प्रतिभेला मिळते संधी, हे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचे ब्रीदवाक्य! त्यानुसार जगभरातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्याची, प्रकाशझोतात येण्याची संधी लाभते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या जगातील सर्वात शक्तिशाली आणि श्रीमंत क्रिकेट संघटनेच्या संकल्पनेतून ‘आयपीएल’ या ट्वेन्टी-२० लीगचा जन्म झाला. त्यामुळे साहजिकच या लीगमध्ये क्रिकेटपटूंना सर्वाधिक पैसा आणि प्रसिद्धी प्राप्त होते.
‘आयपीएल’मुळे भारतीय क्रिकेटला अनेक दर्जेदार खेळाडू लाभले. या लीगमध्ये जगभरातील आघाडीचे खेळाडू तर खेळतातच, शिवाय युवा भारतीय खेळाडूंना सर्वोत्तम प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभते. याच सर्व गोष्टींमुळे ‘आयपीएल’ ही जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय ट्वेन्टी-२० लीग म्हणून ओळखली जाते. या लीगमधील चमकदार कामगिरीच्या बळावर खेळाडूची संपूर्ण कारकीर्द घडल्याची अथवा कारकीर्दीला नवे वळण मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, एका बाजूला या सर्व सकारात्मक गोष्टी असताना, दुसऱ्या बाजूला काही नकारात्मक आणि प्रश्नांकित गोष्टीही आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘आयपीएल’च्या महालिलावात दहा संघांनी मिळून तब्बल १०८ खेळाडूंवर एक कोटी किंवा त्याहून अधिक रुपयांची बोली लावली. मात्र, खरेच इतके खेळाडू ‘करोडपती’ होण्यासाठी पात्र होते का? इतक्या खेळाडूंची कामगिरी संघांनी त्यांच्यावर करोडो रुपये खर्च करण्याइतकी अनन्यसाधारण होती का? की केवळ प्रतिभेच्या जोरावर त्यांच्यावर ‘महा’बोली लागली? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यासाठी वाव आहे.
‘आयपीएल’मधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने यंदा खेळाडू लिलावात यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन (१५.२५ कोटी) आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (८ कोटी) यांच्यासाठी सर्वाधिक रक्कम राखून ठेवण्याचा डाव खेळला व तो यशस्वी ठरला. मात्र, त्याच वेळी त्यांनी लेग-स्पिनर मुरुगन अश्विन (१.६०) आणि डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (१.३०) यांच्यासाठीही कोटींचा टप्पा पार केला. मुरुगन अश्विनने ‘आयपीएल’मध्ये आतापर्यंत चार वर्षांत चार संघांचे प्रतिनिधित्व करताना ३४ सामन्यांत केवळ २६ गडी बाद केले आहेत. तसेच रणजी करंडक स्पर्धेत सातत्याने छाप पाडणाऱ्या उनाडकटला ‘आयपीएल’मध्ये फारसे यश मिळालेले नाही. मात्र, तरीही त्याला वर्षांनुवर्षे खेळाडू लिलावात मोठी रक्कम मिळते. त्याने या लीगमध्ये आतापर्यंत ८६ सामन्यांत ८५ बळी घेताना ८.७४ अशा धावगतीने धावांची खैरात केली आहे. उनाडकटसाठी राजस्थान रॉयल्स संघाने २०१८ आणि २०१९ हंगामापूर्वीच्या लिलावात अनुक्रमे ११.५० आणि ८.४० कोटी रुपये मोजले होते. तसेच गेल्या दोन वर्षांत त्याने सहा कोटी रुपयांची कमाई केली. परंतु त्याला या चार वर्षांच्या कालावधीत ३९ सामन्यांत केवळ २९ गडी बाद करता आले. असे असतानाही मुंबईसारख्या पाच वेळा विजेत्या संघाला त्याच्यावर एक कोटीहून अधिकच बोली लावावेसे वाटले.
त्याचप्रमाणे सनरायजर्स हैदराबादने सातत्याने निराशा करणारा निकोलस पूरन (१०.७५ कोटी) याच्यासह वेस्ट इंडिजचा नवखा अष्टपैलू रोमारियो शेफर्ड (७.७५ कोटी), भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले खेळाडू राहुल त्रिपाठी (८.५० कोटी), अभिषेक शर्मा (६.५० कोटी) आणि कार्तिक त्यागी (४ कोटी) यांना मोठी रक्कम देत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. त्यांनी लिलावापूर्वी ज्या योजना आखल्या, त्याच्या हे विपरीत असल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू सायमन कॅटीचने हैदराबाद संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. ‘आयपीएल’मध्ये खेळण्याचा फारसा अनुभव नसलेल्या लियाम लिव्हिंगस्टोन (११.५० कोटी, पंजाब) आणि वानिंदू हसरंगा (१०.७५ कोटी, बंगळूरु) यांसारख्या खेळाडूंवर संघांनी त्यांच्या मूळ किमतीपेक्षा कितीतरी पटीने मोठी बोली लावली. याउलट, शिखर धवन (८.२५ कोटी, पंजाब), क्विंटन डीकॉक (६.७५ कोटी, लखनऊ), डेव्हिड वॉर्नर (६.२५ कोटी, दिल्ली) यांसारख्या अनुभवी आणि ‘आयपीएल’मध्ये आपले नाणे खणखणीत वाजवलेल्या खेळाडूंना मात्र अपेक्षेपेक्षा कमी रक्कम मिळाली.
त्यामुळे आता कामगिरीला नक्की कितपत महत्त्व उरले आहे, असा प्रश्न निर्माण होतो. केवळ प्रतिभेच्या जोरावर काही खेळाडू कोटींचे धनी होत असतील, तर त्यांना दर्जेदार खेळ करण्याची प्रेरणा मिळेल का? ‘आयपीएल’ लिलावाची गणिते विविध गोष्टींवर अवलंबून असतात. कोणता खेळाडू कोणत्या गटात आहे, संघांना त्यावेळी कोणत्या खेळाडूची आवश्यकता आहे, त्यांच्याकडे किती रक्कम शिल्लक आहे, पुढे कोणते खेळाडू उपलब्ध आहेत, या सर्व बाबींचा संघांना विचार करावा लागतो. मात्र, अखेर कामगिरीपेक्षा मोठे ते काय? त्यामुळे ‘आयपीएल’मध्ये प्रतिभेला संधी मिळत असली, तरी त्या प्रतिभेचे रूपांतर चांगल्या कामगिरीत होणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा या लीगचा दर्जा ढासळण्याची भीती असून भारतीय क्रिकेटचे यात मोठे नुकसान होईल, हे निश्चित!
anvay.sawant@expressindia.com