अन्वय सावंत

‘‘आम्ही विश्वचषकासारख्या स्पर्धामध्ये केवळ सहभागी होत नाही, तर त्या जिंकण्याचे ध्येय बाळगतो. आमच्या सर्व खेळाडू मैदानात जाऊन वर्चस्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतात,’’ हे यष्टीरक्षक-फलंदाज एलिसा हिलीचे वक्तव्य ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाच्या मानसिकतेबाबत खूप काही सांगून जाते. ऑस्ट्रेलियन संघाने महिला क्रिकेटवरील आपली मक्तेदारी पुन्हा सिद्ध करताना काही दिवसांपूर्वीच विक्रमी सातव्यांदा एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावले.

गेल्या काही वर्षांत महिला क्रिकेटचा स्तर झपाटय़ाने उंचावल्याचे पाहायला मिळाले आहे. विविध संघांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत जागतिक महिला क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे यंदा विश्वचषकाच्या जेतेपदासाठी गतविजेता इंग्लंड, गतउपविजेता भारत, यजमान न्यूझीलंड आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला दक्षिण आफ्रिका हे संघ ऑस्ट्रेलियाला आव्हान देतील, असे अपेक्षित होते. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण खेळापुढे कोणत्याही संघाचा निभाव लागला नाही.

न्यूझीलंडमध्ये झालेल्या या विश्वचषकात मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने सातपैकी सात साखळी सामने जिंकत दिमाखात बाद फेरी गाठली. मग वर्चस्वपूर्ण कामगिरी करताना उपांत्य फेरीत वेस्ट इंडिज आणि अंतिम फेरीत इंग्लंडला अनुक्रमे १५७ आणि ७१ धावांनी धूळ चारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या १२ पर्वातील आपल्या सातव्या जेतेपदाला गवसणी घातली. महिला विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने ७० सामने जिंकले असून केवळ ११ सामने गमावले आहेत. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे अशक्यप्राय आव्हान मानले जाते आणि यंदाही त्याचा प्रत्यय आला.

गेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला भारताने पराभवाचा धक्का दिला होता. हरमनप्रीत कौरच्या (११५ चेंडूंत नाबाद १७१ धावा) झंझावाती खेळीपुढे ऑस्ट्रेलियन गोलंदाज निष्प्रभ ठरल्या आणि सामन्याच्या उत्तरार्धात फलंदाजांनीही निराशा केल्याने ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. हे अपयश पचवणे अवघड गेले असले, तरी त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये वेगळीच जिद्द निर्माण झाली. त्या विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाने तब्बल ४० एकदिवसीय सामने जिंकले असून केवळ दोन सामने गमावले आहेत. यात विक्रमी सलग २६ विजयांचाही समावेश आहे. त्यांनी भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या आघाडीच्या संघांनाही त्यांच्या मैदानांवर नमवण्याची किमया साधली. त्यांचा हा विजयरथ गेल्या वर्षी भारताने रोखला होता. मात्र, त्यांनी कामगिरी पुन्हा उंचावत सलग १२ सामने (विश्वचषकात नऊ) जिंकले.

मोक्याच्या क्षणी दमदार कामगिरी करून आपल्या संघाला सामने जिंकवून देण्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा हातखंडा आहे. यष्टीरक्षक-फलंदाज हिलीला विश्वचषकाच्या साखळी फेरीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र, विंडीजविरुद्ध उपांत्य फेरीत १०७ चेंडूंत १२९ धावा, तर इंग्लंडविरुद्ध अंतिम फेरीत १३८ चेंडूंत १७० धावांची अविश्वसनीय खेळी करत हिलीने ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच ऑस्ट्रेलियाच्या या यशात कर्णधार लॅनिंग (९ सामन्यांत ३९४ धावा), सलामीवीर रेचल हेन्स (९ सामन्यांत ४९७ धावा), बेथ मूनी (९ सामन्यांत ३३० धावा) यांनी फलंदाजीत, तर जेस जोनासन (८ सामन्यांत १३ बळी) आणि लेग-स्पिनर अलाना किंग (९ सामन्यांत १२ बळी) यांनी गोलंदाजीत मोलाचे योगदान दिले.

महिला संघाच्या या वर्चस्वपूर्ण यशाचे श्रेय खेळाडू आणि संघ-व्यवस्थापनासह ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ संघटनेलाही जाते. त्यांनी स्थानिक महिला क्रिकेट आणि महिलांच्या बिग बॅश लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटला विशेष महत्त्व दिले आहे. या स्पर्धामुळे देशातील युवा, प्रतिभावान महिला क्रिकेटपटूंना अनुभवी ऑस्ट्रेलियन आणि परदेशी खेळाडूंसह एकत्रित खेळण्याची संधी लाभत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे सक्षम राखीव फळी निर्माण झाली असून मुख्य संघातील खेळाडूंना आपले स्थान टिकवण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागत आहे.

यंदा विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन संघात डार्सी ब्राऊन (वय १८ वर्षे) आणि अ‍ॅनाबेल सदरलँड (२० वर्षे) यांसारख्या युवा खेळाडू होत्या. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नसलेली अष्टपैलू ताहलिया मॅकग्रानेही (१०० धावा आणि पाच बळी) चमक दाखवली. युवा आणि वरिष्ठ खेळाडू एकत्रित येऊन सांघिक कामगिरी करत असल्यानेच ऑस्ट्रेलियाचे महिला क्रिकेटवरील वर्चस्व अबाधित राहिले आहे. आता आगामी काळात त्यांची ही घोडदौड कायम राहणार की त्यांना कोणी रोखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

anvay.sawant@expressindia.com