प्रशांत केणी
त्रिनिदाद अॅण्ड टोबॅगोमधील टुनापुना-पियार्को या झोपडपट्टी भागात किरॉन पोलार्डचा जन्म झाला. त्याच्या बालपणीच वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आईवर पडली. पण तिने हिंमत न हरता एकटीने संघर्ष करीत पोलार्ड आणि त्याच्या दोन बहिणींना मोठे केले. गरिबी पाचवीलाच पुजली होती. हिंसाचार, चोऱ्यामाऱ्या आणि ड्रग्ज आदी गैरमार्ग या गलिच्छ वस्तीत बोकाळले होते. पण पोलार्ड या मार्गाने गेला असता तर क्रिकेटजगतात मुळीच नाव कमावू शकला नसता.
क्रिकेट आणि फुटबॉल हे दोन खेळ टुनापुना-पियार्कोमधील मुले रस्त्यांवर खेळायची. पोलार्डला फुटबॉलसुद्धा आवडायचे. पण क्रिकेट खेळणे आणि पाहणे हा त्याला जणू छंदच जडला होता. ब्रायन लाराचा आदर्श त्याने त्या वयापासून जपला होता. पोलार्डच्या याच क्रिकेटप्रेमाची दखल घेत त्याच्या आईने त्याला क्रिकेट अकादमीत खेळाचे पद्धतशीर प्रशिक्षण घेण्यासाठी टाकले. पोलार्डने अपेक्षेप्रमाणेच मजल दरमजल करीत स्थानिक क्रिकेट गाजवले आणि वेस्ट इंडिजच्या युवा ते वरिष्ठ संघापर्यंत मजल मारली. कसोटी क्रिकेटच्या परंपरेत न रमता कॅरेबियन बेटांवर रुजत चाललेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या हाणामारीच्या नवसंस्कृतीत तो चपखलपणे बसला. फलंदाजावर अंकुश ठेवणारी मध्यमगती गोलंदाजी, विजयवीराची क्षमता असलेली मारधाड वृत्तीची फलंदाजी आणि सीमारेषेपाशी हनुमानउडी घेत षटकाराचे झेलमध्ये रूपांतर करणारे अफलातून क्षेत्ररक्षण कौशल्य ही त्याची वैशिष्टय़े. पण ट्वेन्टी-२०च्या गल्लाभरू क्रिकेटमध्ये हीच हुकमाची पाने. याच बळावर तो देशोदेशींच्या लीग गाजवू लागला. पोलार्ड नावारूपास येत गेला, तशी गरिबी संपून पैशाचा ओघ सुरू झाला. आयुष्यातील दिवस पालटल्यावरही तो आपल्या वृद्ध आईला विसरला नाही. ‘‘आईच्या श्रमांमुळे हे दिवस मी पाहतो आहे. त्याची परतफेड करीत तिचे उर्वरित आयुष्य स्वप्नवत करण्यासाठी मी प्रयत्नशील असतो,’’ असे पोलार्ड आवर्जून सांगतो.
उंची आणि शारिरीक संपदेची निसर्गदत्त देणगी लाभलेल्या प्रसन्न आणि हसतमुख पोलार्डचा मैदानावरील वावर नेहमीच लक्षवेधी असतो. कॅरेबियन नृत्य पद्धतीनेच तो मिळालेल्या यशाचे साजरीकरण करीत प्रेक्षकांची दाद मिळवतो. वेस्ट इंडिजने २०१६मध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. १९७९ नंतर तब्बल ३७ वर्षांनी कॅरेबियन बेटांवरील शिलेदारांनी हा विश्वचषक जिंकला. पण दुखापतीमुळे पोलार्ड विश्वविजेत्या संघाचा सदस्य होऊ शकला नाही.
पोलार्डची कारकीर्द १५ वर्षांची. म्हणजे तशी प्रदीर्घ. १२३ एकदिवसीय सामन्यांत २७०६ धावा, ५५ बळी आणि १०१ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये १५६९ धावा, ४२ बळी असा ऐवज त्याच्या खात्यावर जमा आहे. पण त्याचे राष्ट्रीय संघातील स्थान नेहमीच अनिश्चित असायचे. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या क्रिकेट इतिहासात तो गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉइड, विवियन रिचर्डस, माल्कम मार्शल, लारा यांच्याप्रमाणे महान क्रिकेटपटू होऊ शकला नाही. अगदी २०१९मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे कर्णधारपदही त्याच्याकडे सोपवण्यात आले. पण त्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. गतवर्षी श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यात त्याने अकिला धनंजयाच्या एकाच षटकात सहा षटकार खेचण्याचा पराक्रमही दाखवला. हर्शेल गिब्ज आणि युवराज सिंगनंतर अशी आतषबाजी करणारा पोलार्ड हा तिसरा फलंदाज. विंडीजकडून ट्वेन्टी-२० सामन्यांचे शतक झळकावणारा पोलार्ड हा पहिलाच क्रिकेटपटू. याचप्रमाणे एकंदर ५०० ट्वेन्टी-२० सामने खेळण्याचा महापराक्रम साकारणाराही तो पहिलाच. आतापर्यंत त्याने या वेगवान क्रिकेट प्रकारात १० हजारांहून अधिक धावा काढल्या आहेत.
‘आयपीएल’मध्ये २०१०पासून पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा अविभाज्य भाग. त्यांच्या पाच जेतेपदांच्या यशोगाथेत पोलार्डचा सिंहाचा वाटा आहे, हे कुणीच नाकारू शकणार नाही. एखाद-दुसरे खराब हंगाम सोडले, तर त्याची धावांची टाकसाळ सुरूच आहे. याचप्रमाणे जगभरातील लीग क्रिकेटमध्ये पोलार्ड आपल्या अष्टपैलूत्वाच्या बळावर कमाई करीत आहे. पाकिस्तान सुपर लीग, बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग, ग्लोबल ट्वेन्टी-२० कॅनडा स्पर्धा, टेन-१० लीग अशा स्पर्धामध्ये पोलार्डचा यशोआलेख सदैव उंचावणारा राहिला आहे. यंदाच्या ‘दी हंड्रेड’ क्रिकेट हंगामासाठी त्याला लंडन स्पिरिट संघाने स्थान दिले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतरही लीग क्रिकेट खेळत राहणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. फार मोठी सांख्यिकी नसतानाही स्वप्न आणि क्रिकेटमधील क्षमतेच्या बळावर गरिबीतून श्रीमंतीपर्यंत प्रवास करणारा ‘लीग-नायक’ पोलार्ड हा एक आख्यायिका झाला आहे.
prashant.keni@expressindia.com