अन्वय सावंत

विश्रांती!.. हा शब्द गेल्या काही काळापासून क्रिकेटवर्तुळात खूप गाजतो आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या संकटापासून क्रिकेटपटूंना दूर ठेवण्यासाठी जैवसुरक्षा परिघाचा घाट घालण्यात आला. खेळाडूंना तासन् तास हॉटेलमधील आपल्या बंदिस्त खोलीत बसून राहावे लागत होते. केवळ मैदानात जाऊन क्रिकेट खेळण्याची संधी मिळणे, हाच काय तो दिलासा. परिणामी खेळाडूंचा बाहेरच्या जगापासून, लोकांपासून संपर्क तुटला. त्यातच क्रिकेट सामन्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने खेळाडूंना मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांना अधूनमधून विश्रांती देणे, हाच पर्याय क्रिकेट मंडळांपुढे उपलब्ध आहे. मात्र, विश्रांतीचे वाढते प्रमाण काही माजी खेळाडूंना फारसे रुचलेले नाही.

‘‘खेळाडूंच्या विश्रांतीचे धोरण मला अजिबातच मान्य नाही. खेळाडू ‘आयपीएल’दरम्यान विश्रांती घेत नाहीत, मग भारतासाठी खेळताना त्यांना विश्रांतीची गरज का भासते? मला हे पटलेले नाही,’’ असे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर  यांनी काही दिवसांपूर्वी ताशेरे ओढले होते. त्याचप्रमाणे ‘अ+’ आणि ‘अ’ श्रेणीतील क्रिकेटपटूंना भरघोस मानधन मिळत असल्याने त्यांनी अधिकाधिक सामने खेळणे गरजेचे आहे. त्यांनी विश्रांती घेतल्यास त्यांच्या अर्थकारणावर परिणाम झाला पाहिजे. ‘बीसीसीआय’ने हा निर्णय घेतल्यास कोणताही क्रिकेटपटू विश्रांतीसाठी धजावणार नाही, असेही गावस्कर  यांना वाटते. 

तसेच ‘‘मी भारतीय संघात असताना विश्रांती ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. तुमची संघात निवड व्हायची किंवा तुम्हाला वगळले जायचे,’’ असे म्हणत माजी डावखुरा वेगवान गोलंदाज आर.पी. सिंहने सध्याच्या खेळाडूंवर टीकास्त्र सोडले. त्यांच्या या विधानांमुळे क्रिकेटपटूंना विश्रांतीची खरेच इतकी गरज आहे का? त्यांना विश्रांती दिलीच, तर ती किती असावी? खेळाडूंना सातत्याने विश्रांती देणे, हे भारतीय क्रिकेटसाठी पोषक आहे की बाधक? असे विविध प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडले आहेत. 

गेल्या काही वर्षांत क्रिकेटचे प्रमाण खूप वाढले आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. केवळ याच वर्षांचा विचार करायचा झाल्यास भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध दोन, तर इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामना खेळला. फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. तसेच भारतीय संघाचे वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध तीन-तीन ट्वेन्टी-२० सामने झाले. मग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिकाही झाली.

या मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंड आणि आर्यलडच्या दौऱ्यावर गेला. तिथे एका कसोटी सामन्याव्यतिरिक्त एकूण पाच ट्वेन्टी-२० सामने आणि तीन एकदिवसीय सामने भारतीय खेळाडूंना खेळावे लागले. त्यापूर्वी, दोन महिने खेळाडू ‘आयपीएल’मध्ये व्यस्त होते. इंग्लंड दौरा संपल्यावर त्वरित भारतीय संघ वेस्ट इंडिजला रवाना होईल. या वर्षी त्यांना आशिया चषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक यांसारख्या स्पर्धाही खेळायच्या आहेत.

सातत्याने इतके सामने खेळल्यानंतर खेळाडूंवर ताण येणे, त्यांना थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांना अधूनमधून क्रिकेटपासून दूर ठेवण्यात काहीच गैर नाही. मात्र, ही विश्रांती कधी द्यायची, याबाबत अधिक गांभीर्याने विचार झाला पाहिजे. विराट कोहलीला सध्या धावांसाठी झगडावे लागत आहे. या परिस्थितीत त्याने वेस्ट इंडिजमध्ये सामने खेळण्यापेक्षा विश्रांतीला प्राधान्य देणे कितपत योग्य आहे? तुलनेने दुबळय़ा विंडीजविरुद्ध खेळपट्टीवर वेळ घालवणे, धावा करणे कोहलीला अधिक सोपे गेले असते. परंतु या संधीला तो मुकणार आहे.

प्रमुख खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक असले, तरी त्यामुळे विश्वचषकासारख्या स्पर्धेसाठी संघबांधणी करताना बरेच अडथळे निर्माण होतात. ‘आयपीएल’मुळे भारताला अनेक युवा, प्रतिभावान खेळाडू मिळाले आहेत. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत या युवकांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते. मात्र, त्यांनी कितीही दर्जेदार कामगिरी केली, तरी वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन झाल्यानंतर त्यांना पुन्हा संघाबाहेर बसावे लागते. मग त्यांच्यावर हा अन्याय नाही का?

त्यामुळे आता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि ‘बीसीसीआय’ला मिळून विचारपूर्वक सुवर्णमध्य काढावा लागणार आहे. खेळाडूंना विश्रांती कधी द्यायची, त्यांना केवळ मोठय़ा संघांविरुद्ध आणि मोठय़ा स्पर्धामध्ये खेळायला लावायचे का? याचा विचार करावा लागेल. विश्रांतीचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही ना, हे पाहावे लागेल. अन्यथा प्रमुख खेळाडूंचा खेळ खालावण्याची भीती असून याचा विपरीत परिणाम भारतीय संघाच्या निकालांवर होईल.

व्यग्र वेळापत्रकामुळे खेळाडूंना विश्रांती गरजेची!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकामुळे खेळाडूंना अधूनमधून विश्रांती देणे गरजेचे आहे. आता कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० असे क्रिकेटचे तिन्ही प्रकार खेळण्यासाठी खेळाडूंवर दडपण असते. त्यातच ‘आयपीएल’सारख्या स्पर्धामुळे सामन्यांची संख्या वाढते. या परिस्थितीत प्रमुख खेळाडूंना थकवा जाणवू नये आणि ते विश्वचषक, आशिया चषक यांसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धासाठी पूर्णपणे तंदुरुस्त राहावेत याकरिता त्यांना विश्रांती देण्याशिवाय पर्याय नाही. भारताचे प्रमुख खेळाडू ‘आयपीएल’दरम्यान विश्रांती का घेत नाहीत, असा सवाल बऱ्याचदा उपस्थित केला जातो. मात्र, ही स्पर्धा केवळ दोन महिने चालते. या स्पर्धेतील संघ भारताच्या तारांकित खेळाडूंवर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांना सामने टाळणे शक्य होत नाही, हे समजून घेणे आवश्यक आहे. 

दिलीप वेंगसरकर, भारताचे माजी कर्णधार