अन्वय सावंत
बर्मिगहॅम येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच महिलांच्या ट्वेन्टी-२० क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. अपेक्षेप्रमाणे विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम कामगिरी करताना सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्यामुळे एकाच वेळी ट्वेन्टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि राष्ट्रकुल क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळवणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला महिला संघ ठरला. मात्र, या स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला. त्यांची कर्णधार मेग लॅनिंगने वैयक्तिक कारणांस्तव क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली.
त्याच दिवशी न्यूझीलंडचा प्रमुख डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने आपल्या वार्षिक करारावर पाणी सोडताना ट्वेन्टी-२० फ्रेंचायझी क्रिकेट आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याला प्राधान्य दिले. क्रिकेटचे तिन्ही प्रकार खेळण्याचे दडपण आणि सामन्यांची वाढती संख्या, यामुळे इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे उदाहरण ताजे असतानाच आता लॅनिंग आणि बोल्ट यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंवर असणाऱ्या शारीरिक व मानसिक ताणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लॅनिंगची महिला क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाज आणि कर्णधारांमध्ये गणना केली जाते. २०१०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या लॅनिंगची २०१४मध्ये वयाच्या २१व्या वर्षी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. तेव्हापासून तिच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून १७१ पैकी १३५ सामने जिंकले आहेत. तसेच फलंदाज म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी करताना तिने आपली तंदुरुस्ती टिकवली आहे. २०१७ सालापासून ती केवळ पाच सामन्यांना मुकली आहे. यावरूनच तिचे सातत्य आणि ऑस्ट्रेलियन संघासाठी तिचे महत्त्व स्पष्ट होते.
गेल्या काही वर्षांत महिला क्रिकेटने झपाटय़ाने प्रगती केली आहे. विशेषत: भारतीय महिला संघाने आपली कामगिरी उंचवल्यामुळे महिला क्रिकेटकडे नवे प्रेक्षक आकर्षित झाले आहेत. परिणामी भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांसारख्या देशांच्या तारांकित महिला क्रिकेटपटूंकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना मैदानावर दमदार कामगिरी करतानाच मैदानाबाहेर माध्यमांना अधिक वेळ द्यावा लागत आहे. समाजमाध्यमांवर सक्रिय राहावे लागत आहे. लॅनिंगसारख्या मितभाषी खेळाडूवर या सर्व गोष्टींचा ताण येणे स्वाभाविक आहे. परंतु ती शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा पूर्णपणे तंदुरुस्त होऊन लवकरच मैदानावर पुनरागमन करेल अशी ऑस्ट्रेलियाला आशा आहे.
दुसरीकडे, ३३ वर्षीय बोल्टने घेतलेल्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) चिंता वाढली आहे. जगभरात कितीही ट्वेन्टी-२० लीग सुरू झाल्या, तरी नामांकित खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पसंती देतील, असा ‘आयसीसी’ला विश्वास होता. मात्र, आता हळूहळू या विश्वासाला तडा जाण्यास सुरुवात झाली आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे कमी वेळात अधिक पैसा मिळवण्याचा पर्याय क्रिकेटपटूंना उपलब्ध झाला आहे. त्यातच अमिराती आणि दक्षिण आफ्रिकेत नव्याने सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० लीगमधील सर्व संघ ‘आयपीएल’मधील संघमालकांनी खरेदी केल्यामुळे या स्पर्धा यशस्वी होण्याची शक्यता बळावली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकामुळे खेळाडूंना बराच काळ आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहावे लागत आहे. याचा त्यांच्यावर मानसिक ताण पडतो आहे. तसेच वेगवान गोलंदाजांची कारकीर्द ही अन्य खेळाडूंच्या तुलनेत कमी कालावधीची असते. त्यांना दुखापतींचा धोका असतो. या सर्व गोष्टी आणि ताणांचा गांभीर्याने विचार केल्यानंतर बोल्टने न्यूझीलंड क्रिकेटकडे वार्षिक करारातून मुक्त करण्याची विनंती केली. याचा त्याच्या न्यूझीलंड संघातील निवडीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्याला ठाऊक आहे.
‘‘माझ्यासाठी हा निर्णय घेणे खूप अवघड होते. देशासाठी खेळणे हे माझे लहानपणीपासूनचे स्वप्न होते आणि गेल्या १२ वर्षांत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करताना मिळवलेल्या यशाचा मला अभिमान आहे. मात्र, माझी पत्नी आणि आमची तीन लहान मुले यांचा विचार करून मला हा निर्णय घ्यावा लागला. आम्हाला क्रिकेटपलीकडच्या आयुष्याचाही कधीतरी विचार करावा लागणारच होता. मला अजूनही देशासाठी खेळायचे असून मी आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडू शकतो याची मला खात्री आहे. मात्र, राष्ट्रीय करारातून मुक्त झाल्याने मला संघाबाहेर राहावे लागू शकेल याचीही कल्पना आहे,’’ असे बोल्ट म्हणाला.
आता ‘आयसीसी’सह जगभरातील सर्व क्रिकेट मंडळांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. अधिकाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळवून आर्थिक फायदा मिळवण्याच्या क्रिकेट मंडळांच्या मोहापायी खेळाडूंचे मात्र नुकसान होत आहे. त्यांना सातत्याने विश्रांती घेणे किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि ट्वेन्टी-२० लीगपैकी एकाची निवड करणे भाग पडते आहे. सर्वोत्तम खेळाडूंविना आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या गुणवत्तेवर आणि दर्जावर विपरीत परिणाम होईल, हे नक्की.