|| प्रशांत केणी
कसोटी म्हणजे कादंबरी, एकदिवसीय प्रकार म्हणजे कथा, तर ट्वेन्टी-२० क्रिकेट ही लघुकथा, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बहुदिनांचे पारंपरिक क्रिकेट पाच दिवसांचे झाले. मग कालौघात सत्तरीच्या दशकात ६० षटकांचे मर्यादित षटकांचे क्रिकेट रुजले. ते ५० षटकांचे एकदिवसीय क्रिकेट म्हणून लोकप्रिय झाले आणि नंतर २०००च्या दशकात ट्वेन्टी-२० हे लघुरूप अधिक लोकाभिमुख झाले. आता टेन-१० या अतिलघुरूपाकडे क्रिकेटची वाटचाल सुरू असताना भारतीय क्रिकेट संघ रविवारी एक हजार एकदिवसीय सामन्यांचा ऐतिहासिक टप्पा गाठणारा पहिला संघ ठरत आहे.
१९७१ मध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या गौरवशाली अध्यायाला प्रारंभ झाला. पण १३ जुलै, १९७४ या दिवशी भारतीय संघ हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्ध पहिलावहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या ४८ वर्षांच्या एकदिवसीय क्रिकेट इतिहासात भारतीय संघाने आणि खेळाडूंनी कमकुवत संघ ते बलाढय़ संघ अशी प्रगती केली आहे. १९८३ आणि २०११ असे एकदिवसीय क्रिकेटचे दोन विश्वचषक तसेच एक चॅम्पियन्स करंडक (२०१३) भारताच्या यशाची ग्वाही देतात. कपिलदेव, मोहिंदूर अमरनाथ, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग यांच्यासारख्या असंख्य शिलेदारांमुळे भारताला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही यशोगाथा लिहिता आली.
१९७५ आणि १९७९ या पहिल्या दोन विश्वचषक स्पर्धामध्ये भारताला पहिल्या फेरीचा अडथळाही ओलांडता आला नव्हता. पहिल्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात गावस्करने ६० षटके खेळून काढत १७४ चेंडूंत फक्त नाबाद ३६ धावा काढल्या होत्या. त्यामुळे भारताच्या धावफलकावर ३ बाद १३२ धावा झळकल्या होत्या. हा सामना भारताने २०२ धावांनी गमावला. याच भारताने २०११मध्ये विंडीजविरुद्ध ४१८ धावांचा डोंगर उभारला. १९८३ मध्ये मात्र कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने कात टाकत दोन वेळा जगज्जेत्या वेस्ट इंडिजचे वर्चस्व झुगारत विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. या पराक्रमाने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकला. याच स्पर्धेतील कपिलची १७५ धावांची झुंजार खेळी ही आख्यायिका बनली. हे भारतीय फलंदाजाने साकारलेले पहिले एकदिवसीय शतक होते. टेलिव्हिजनद्वारे क्रिकेट आणि देशवासीयांना जोडण्यात यश याच स्पर्धेवेळी आले. १९८०च्या दशकात कपिल, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारतीय फलंदाजीची ताकद अधिक सक्षम असल्याचे दाखवून दिले.
१९८५ मध्ये भारताने पाकिस्तानला नमवून ऑस्ट्रेलियातील जागतिक क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत एकूण १८२ धावा आणि आठ बळी घेणाऱ्या शास्त्रीला स्पर्धेतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार म्हणून ‘ऑडी १००’ कार भेट मिळाली, तेव्हा समस्त देशवासीयांना त्याचे कौतुक वाटले होते. १९८७मध्ये इंग्लंडच्या यजमानपदाला आव्हान देत भारत आणि पाकिस्तानमध्ये रिलायन्स विश्वचषकाचे आयोजन केले. या स्पर्धेपासून एकदिवसीय सामने ५० षटकांचे झाले. मग १९९६ आणि २०११मध्ये भारताने सहयजमानपद सांभाळले.
१९८९ मध्ये सचिन तेंडुलकरच्या पदार्पणानंतर एकदिवसीय क्रिकेटची व्याख्या बदलली. त्याने आपल्या २३ वर्षांच्या एकदिवसीय कारकीर्दीतील सर्वाधिक ४६३ सामन्यांत विक्रमी ४९ शतकांसह एकूण सर्वाधिक १८,४२६ धावा काढल्या आहेत. भारताच्या एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीतील २००, ३००, ४००, ५००, ६००, ७०० आणि ८००व्या सामन्यांमध्ये त्याने प्रतिनिधित्व केले आहे. इतकेच नव्हे, तर एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतकही त्याच्या नावावर आहे. शारजातील एकदिवसीय सामने म्हणजे क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी ठरायचे. १९९८ मध्ये वाळूच्या वादळानंतर सचिनने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पिसे काढणारी झंझावाती अभिजात खेळी साकारली होती.
१९९२च्या विश्वचषकापासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पांढऱ्या कपडय़ांच्या जागी रंगीत कपडे आणि लालऐवजी पांढरा चेंडू वापरला जाऊ लागला. भारतीय क्रिकेटनेही आकाशाशी जवळीक साधणारा निळा रंग अंगीकारला. अझरुद्दीनचे नेतृत्व भारतासाठी यशदायी ठरले. पण २००० मध्ये सामना निश्चितीमुळे भारतीय क्रिकेट ढवळून निघाले. याच कालखंडात सौरव गांगुलीने नेतृत्वाची परिभाषा बदलली. त्याच्या आक्रमक वृत्तीने प्रतिस्पर्धी संघांवरील दडपण वाढवले. इंग्लंडमध्ये नॅटवेस्ट तिरंगी स्पर्धा जिंकल्यानंतर गांगुलीने टीशर्ट फडकावत अॅन्ड्रय़ू फ्लिंटॉफचा वचपा काढला होता. मग २००७च्या एकदिवसीय विश्वचषकात भारत अपयशी ठरला आणि राहुल द्रविडने कर्णधारपद सोडले.
मग शांत वृत्तीच्या पण मैदानी रणनीतीकार धोनी युगाचा उदय झाला. हेलिकॉप्टरसारखे अफलातून फटके खेळण्यात पटाईत असलेल्या धोनीने भारताला क्रिकेट क्रमवारीत अग्रेसर ठेवले. धोनीनेच २०११ मध्ये सचिनचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न वानखेडे स्टेडियमवर साकारले. सचिननंतर विराट कोहली एकापाठोपाठ एक विक्रमांचे इमले रचू लागला. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर आपसुकच ते विराटकडे गेले. विराटची शैलीही आक्रमक. त्यामुळे भारताची वर्चस्वपताका ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या देशांमध्ये तेजाने फडकू लागली. पण ‘बीसीसीआय’शी मतभेदांमुळे विराटने कर्णधारपद सोडले. सध्याचा कर्णधार रोहित शर्माच्या खात्यावर तीन द्विशतके जमा आहेत. सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा सलामीवीर रोहित भारताच्या एकदिवसीय क्रिकेटला तो कोणत्या स्तरापर्यंत नेतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
prashant.keni@expressindia.com