ज्ञानेश भुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अखेर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा एकदाच्या पार पडल्या. हो..नाही..असे करत सात वर्षांनी गुजरात सरकारने पुढाकार घेण्याचे धाडस दाखविल्यावर ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे सूप वाजले. क्रीडा मंडळ म्हणून सहभागी झालेल्या सेनादल संघाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. सलग चौथ्यांदा त्यांनी ही कामगिरी केली. गेल्या तीन स्पर्धेत पहिल्या तीनांत नसणाऱ्या महाराष्ट्राने या वेळी दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. हरयाणाला पुन्हा एकदा तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राची झेप नक्कीच कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरली. त्यातही महाराष्ट्राने हरयाणाला मागे टाकले हे खास. कारण, आशियाई, राष्ट्रकुल, ऑलिम्पिक कुठल्याही स्पर्धा असो, भारतीय संघात हरयाणा आणि महाराष्ट्राचे खेळाडू किती याची चर्चा अधिक रंगते. अर्थातच, यात हरयाणाचा आकडा जास्त असतो. मग, महाराष्ट्र इतका मागे का या चर्चेला सुरुवात होते. मात्र, त्या सगळय़ा चर्चेला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्तर मिळाले.

महाराष्ट्राच्या या कामगिरीची दखल निश्चित घ्यायला हवी. सात वर्षे विलंबाने होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धा अचानक गुजरात सरकारने इच्छाशक्ती दाखवल्यामुळे झटपट पार पडल्या. बहुतेक राज्यांतील खेळाडूंना तयारीसाठी फारसा वेळही मिळाला नाही. अशा अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची खिंड लढवली. युवा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलच्या सुवर्णपदकाने महाराष्ट्राने सुरुवात केली. पण, अखेरच्या चार दिवसांपर्यंत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर महाराष्ट्राने दर्जेदार कामगिरीसह दुसऱ्या स्थानापर्यंत धडक मारली. मात्र, यानंतरही महाराष्ट्राने आपल्या कामगिरीविषयी आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. मल्लखांब आणि योगासन या ऑलिम्पिकमध्ये नसलेल्या खेळांमध्ये महाराष्ट्राने  यशस्वी कामगिरी केली. मल्लखांब, योगासन यांना खेळाचा दर्जा मिळाला आणि त्यांचा पारंपरिक खेळ म्हणून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश झाला, हे महाराष्ट्राच्या पथ्यावर पडले यात शंका नाही. मात्र, बॉक्सिंग, कुस्ती, वेटलिफ्टिंग, नेमबाजी, जलतरण आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्र मागे राहिला हे विसरून चालणार नाही.

केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या युवा क्रीडा स्पर्धेत सातत्याने महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळविला आहे. खेलो इंडियातून पुढे आलेली गुणवत्ता कुठे गेली, ती गुणवत्ता तेवढय़ापुरतीच मर्यादित राहणार का, याचा आता विचार होण्याची गरज आहे. कुस्तीमध्ये गेल्या चार महिन्यांत महाराष्ट्राच्या कुमार खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर किमान यश मिळविले आहे. कुस्ती महासंघाच्या १८, २१, २३ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र सातत्याने विजयमंचावर दिसून आला आहे. तीच स्थिती जलतरण, अ‍ॅथलेटिक्स प्रकारात कमी अधिक प्रमाणात दिसून येते. कुमार गटातील यश वरिष्ठ गटात आल्यावर लोप पावते. कुमार गट ते वरिष्ठ गट यामधील जी दरी आहे, त्यावर लक्ष देण्याची गरज आहे.

कुस्तीतील महाराष्ट्राचा नावलौकिक कमी होत चालला आहे. कबड्डीत हरयाणा, उत्तर प्रदेशपाठोपाठ हिमाचल प्रदेशचे आव्हान आता उभे राहात आहे. दक्षिणेकडच्या राज्यांनी अ‍ॅथलेटिक्सवर नजर ठेवली, तर कर्नाटकने जलतरणातील मक्तेदारीही सोडली नाही. परंतु महाराष्ट्राने अशा कुठल्या खेळात वर्चस्व गाजवले? त्यामुळे सुवर्णपदकांची संख्या कमी राहिल्याने महाराष्ट्राला पदकतालिकेत पहिल्या क्रमांकापासून वंचित राहावे लागले. मल्लखांब आणि योगासन या आजपर्यंत क्रीडा क्षेत्राच्या खिजगणतीतही नसलेल्या क्रीडा प्रकारांनी महाराष्ट्राला सावरले आहे. खेळ म्हणून मान्यता असलेल्या खेळांमध्ये महाराष्ट्राची पीछेहाट राहिली आहे हे सत्य आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या माध्यमातून ‘राज्य मिनी ऑलिम्पिक’ स्पर्धेच्या आयोजनाचे बीज रोवले होते. मात्र, त्यातही सातत्य नाही. एकदा दोनदा झाल्यानंतर गेली २८ वर्षे ही स्पर्धा फक्त कागदावरच राहिली आहे. आता नव्याने या स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरू झाली आहे. स्पर्धा होणे केव्हाही चांगले, पण स्पर्धेनंतर उभ्या राहिलेल्या क्रीडा सुविधांचा वापर होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राकडे गुणवत्ता आहे, पदकांचा रंग बदलण्याची क्षमता आपल्या खेळाडूंमध्ये आहे. गरज आहे ती केवळ गुणवत्ता हेरण्याची आणि त्या गुणवत्तेला परिपूर्णतेची जोड देण्याची. तसे झाले, तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिळविलेले मोठे यश आंतरराष्ट्रीय स्तरावर परावर्तित होण्यासाठी वेळ लागणार नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunday special watch the quality national sports competition maharashtra haryana ysh