Why Sunil Chhetri Come Out of Retirement: भारतीय फुटबॉलसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ४० वर्षीय स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीने निवृत्तीतून परतण्याचा निर्णय घेतला आहे. सुनील छेत्री हा भारतासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. सुनील छेत्री जवळपास ४० वर्षांचा आहे, त्याने गेल्या वर्षी जूनमध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. पण तब्बल ८ महिन्यांनंतर तो भारताच्या फुटबॉल संघात पुनरागमन करत आहे.
भारताच्या फुटबॉल संघाचं सोशल मीडिया पेज इंडियन फुटबॉल यावर पोस्ट करत ही माहिती देण्यात आली. ६ मार्चलाभारतीय फुटबॉल संघाने एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये सुनील छेत्रीच्या फोटोसह कॅप्शन दिले आहे, ‘कर्णधार, नेता, दिग्गज खेळाडू मार्चमध्ये फिफा आंतरराष्ट्रीय विंडोसाठी भारतीय राष्ट्रीय संघात परत येईल.’
मार्च २०२५ पासून सुरू होणाऱ्या आगामी फिफा आंतरराष्ट्रीय विंडोमध्ये भारतीय संघाला मदत करण्यासाठी सुनील छेत्रीने हा निर्णय घेतला आहे. २५ मार्च रोजी बांगलादेशविरुद्ध AFC आशियाई चषक २०२७ पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीत तो खेळणार आहे. शिलाँगमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भारतीय वरिष्ठ पुरुष संघाचे दोन सामने होणार आहेत.
सुनील छेत्रीने शानदार कारकिर्दीनंतर निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एका वर्षाच्या आत हे पाऊल उचलले आहे. त्याच्या निवृत्तीनंतर भारतीय फुटबॉलमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे जी अजून भरून काढणं अद्याप बाकी आहे. भारताचा सर्वकालीन आघाडीचा गोल-स्कोअरर सुनील छेत्रीने गेल्या वर्षी जूनमध्ये कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने अक्षरश: अश्रूंसह आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम देत भारतीय संघाचा निरोप घेतला. त्यानंतर फिफा विश्वचषक २०२६ च्या पात्रता फेरीत भारताने कुवेतसह गोलशून्य बरोबरी साधली.
सुनील छेत्री पुरूष फुटबॉलमधील सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी आणि अली दाई यांच्या मागे आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत १५१ सामन्यात ९४ गोल केले आहेत. निवृत्तीनंतर माघार घेतल्यानंतर, सुनील छेत्रीला १०० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या खेळाडूंच्या विशेष यादीत सामील होण्याची संधी मिळेल. सुनील छेत्रीने २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले होते. सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर इंडियन सुपर लीगमध्ये बेंगळुरू एफसीकडून खेळताना दिसला आहे.