पीटीआय, नवी दिल्ली : तारांकित आघाडीपटू सुनील छेत्री, अनुभवी बचावपटू संदेश झिंगन आणि गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू यांचा आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या २२ सदस्यीय पुरुष फुटबॉल संघात समावेश करण्यात आला आहे. हांगझो येथे २३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी छेत्रीच्या नेतृत्वाखाली आणि प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या पसंतीचा संघ पाठविण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) प्रयत्नशील होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, त्यांनी या तिघांची नावे भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे (आयओए) पाठवली नव्हती. त्यामुळे त्यांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागाबाबत साशंकता होती. परंतु, आता प्रमुख खेळाडूंच्या निवडीस आशियाई क्रीडा स्पर्धेचे संयोजक आणि आशियाई ऑलिम्पिक समितीकडून मान्यता मिळाली आहे. आशियाई क्रमवारीतील अव्वल आठ संघांनाच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठविण्याची क्रीडा मंत्रालयाची योजना होती. त्यामुळे भारताच्या पुरुष आणि महिला संघांचा या स्पर्धेतील सहभागाबाबत अनिश्चितता होती. मात्र, ‘एआयएफएफ’च्या प्रयत्नांनंतर दोन्ही संघांना हांगझो येथील स्पर्धेसाठी पाठविण्याचा क्रीडा मंत्रालयाने निर्णय घेतला.

या स्पर्धेत सहभागी २३ संघांना सहा गटांमध्ये विभागण्यात आले आहे. भारतीय पुरुष संघाचा चीन, बांगलादेश आणि म्यानमार यांच्यासह अ-गटात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ नऊ वर्षांनंतर या स्पर्धेत खेळणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉल २३ वर्षांखालील गटात खेळले जाते. यंदाची स्पर्धा गेल्या वर्षी होणार होती. परंतु ही स्पर्धा एका वर्षांने लांबणीवर पडल्याने यंदाच्या फुटबॉल स्पर्धेत २४ वर्षे वय असलेल्या खेळाडूंना संघात स्थान देण्याची मुभा आहे. यासह तीन वरिष्ठ खेळाडूंचाही या संघात समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळेच छेत्री (वय ३८ वर्षे), झिंगन (३० वर्षे) आणि गुरप्रीत (३१ वर्षे) यांचा आशियाई स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.

भारतीय संघ

९ गोलरक्षक : गुरप्रीत सिंग संधू, गुरमीत सिंग, धीरज सिंह मोइरांगथेम.

९ बचावपटू : संदेश झिंगन, अन्वर अली, नरेंद्र गहलोत, लालचुंगनुंगा, आकाश मिश्रा, रोशन सिंह, आशीष राय.

९ मध्यरक्षक : जॅक्सन सिंह थौनाओजम, सुरेश सिंह वांगजाम, अपुया राल्टे, अमरजीत सिंग कियाम, राहुल केपी, नौरेम महेश सिंग.

९ आक्रमकपटू : शिवा शक्ती नारायणन, रहीम अली, सुनील छेत्री, अनिकेत जाधव, विक्रम प्रताप सिंह, रोहित दानू.