भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीची अखिल भारतीय फुटबॉल महासंघातर्फे देण्यात येणाऱ्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी निवड झाली. महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी यासंदर्भात घोषणा केली. २ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. छेत्रीने याआधी २००७ आणि २००१ मध्ये या पुरस्कारावर नाव कोरले होते. आय. एम. विजयन यांच्यानंतर हा पुरस्कार तीनदा पटकावणारा सुनील पहिला भारतीय फुटबॉलपटू ठरला आहे. आय-लीग संघांच्या प्रशिक्षकांनी मतदानाद्वारे छेत्रीची या पुरस्कारासाठी निवड केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातर्फे सर्वाधिक गोल करण्याचा मान ४३ गोलांसह सुनीलच्या नावावर आहे. ‘‘या पुरस्काराने खूप आनंद झाला आहे. सर्व संघांच्या प्रशिक्षकांचा मी आभारी आहे. पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. पुरस्काराने संतुष्ट होण्यापेक्षा कामगिरी आणखी चांगली करण्याचा माझा प्रयत्न असेल,’’ असे सुनील छेत्रीने सांगितले. ओइनम बेंबम देवीची वर्षांतील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू पुरस्कारासाठी निवड झाली. मिझोरमच्या जेजे लालपेखुलाची सवरेत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवड झाली.

Story img Loader