भारतीय फुटबॉल क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेणाऱ्या इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलच्या दुसऱ्या सत्राची चाहूल हळूहळू जाणवू लागली आहे. या लीगचे जेतेपद पटकावण्यासाठी आठही संघांनी विदेशातील दिग्गज खेळाडूंना आपल्या चमूत सहभागी केले. मात्र, यंदा भारताच्या अव्वल खेळाडूंनी या स्पध्रेत खेळण्याची इच्छा प्रकट केल्याने कोण कुणाकडून खेळेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आयएसएलच्या दुसऱ्या सत्रासाठी शुक्रवारी भारतीय खेळाडूंचा लिलाव मुंबईत होणार आहे. या लिलावात भारताचा सर्वात यशस्वी फुटबॉलपटू सुनील छेत्रीला आपल्या चमूत घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून चार वेळा सवरेत्कृष्ट खेळाडू पुरस्कार पटकावणारा आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा छेत्री आयएसएलमध्ये कोणत्या संघाकडून खेळणार, याचे उत्तर शुक्रवारीच मिळणार आहे. ३ ऑक्टोबर ते ६ डिसेंबर या कालावधीत दुसरे सत्र खेळविण्यात येणार आहे. ३० वर्षीय छेत्रीला सर्वाधिक ८० लाख रुपयांची मूळ किंमत देण्यात आली आहे. छेत्रीचा विक्रम आणि सध्याचा फॉर्म पाहता त्याच्यासाठी जास्तीत जास्त बोली लावण्याची तयारी संघ मालकांनी दर्शवली आहे. त्यामुळे मुळ किमतीच्या तिप्पट-चौप्पट रक्कम छेत्रीला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.
छेत्रीसह करनजीत सिंग, अ‍ॅनास एडाथोडिका, अराता इजुमी, रॉबिन सिंग, इयुगेनसन लिंगडोह, जॅकीचंद सिंग, सेइत्यसेन सिंग आणि रिनो अँटो या खेळाडूंवरही नजरा असणार आहेत. हे दहाही खेळाडू आय-लीगमधील संघांशी करारबद्ध असल्यामुळे आयएसएलच्या पहिल्या सत्राला मुकले होते. मात्र, यंदा त्यांनी आयएसएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या अव्वल दहा खेळाडूंपैकी छेत्री, रॉबिन सिंग, थोई सिंग, इजुमी, इडाथोडिका आणि करनजीत यांना आयएसएलच्या प्रचारासाठी करारबद्ध केले आहे. यापैकी जॅकीचंद आणि सेईत्यसेन यांना आय-लीगच्या रॉयल व्ॉहिंगडोह क्लबकडून, तर रिनो आणि इयुगेनसन यांना बंगळुरू एफसी क्लबडून घेण्यात आले आहे. या दहा खेळाडूंव्यतिरिक्त एकूण ११३ भारतीय खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे.
आठ संघांनी आतापर्यंत एकूण ६४ भारतीय खेळाडूंना करारबद्ध केले आहे. काहींनी खेळाडूंना कायम राखले, तर काहींनी खुल्या बाजारातून विकत घेतले आहे. त्यामुळे शुक्रवारी आठ संघांना मिळून केवळ ४० खेळाडूंना करारबद्ध करता येणार आहे. या लिलाव प्रक्रियेत अ‍ॅटलेटिको दी कोलकाता संघाचा सहमालक आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसह अनेक नावाजलेली व्यक्तिमत्त्व उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२१ प्रत्येक संघाला २१ कोटी रुपये खर्च करण्याची मुभा असून त्यातील ५.५० कोटी भारतीय, तर १५.५० कोटी विदेशी खेळाडूंसाठी खर्च करण्याचा नियम आहे.

२६ पहिल्या सत्रात एका क्लबला एकूण २२ खेळाडूंना करारबद्ध करण्याची असलेली मर्यादा २६ केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil chhetri spearheads list in player auction in indian super league