अफगाणिस्तानविरुद्धच्या अर्थहीन सामन्यात संपूर्ण संघ कायम राखल्याबद्दल भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी संघ व्यवस्थापनावर कडाडून टीका केली आहे. राखीव खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर संघातील कायम खेळाडूंचे अस्तित्व धोक्यात येईल, या भीतीपोटी संघात बदल केला नसावा, असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
आशिया चषक क्रिकेट स्पध्रेची अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. या परिस्थितीत फक्त औपचारिकता ठरणाऱ्या साखळीतील अखेरच्या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे यांना संघात स्थान देण्यात आले नाही. ‘‘माझ्या मनात एक शंका येते की, जर या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, तर संघातील कायम खेळाडूंचे काय होईल, ही भीती संघ व्यवस्थापनाला जाणवत असावी. या खेळाडूंना आता ठाऊक झाले आहे की, आपण काहीही केले तरी संघात आहोत,’’ असे गावस्कर यांनी सांगितले. ‘‘चेतेश्वर पुजाराने चांगली कामगिरी केली तर सातत्यपूर्ण कामगिरी दाखवण्यात अपयशी ठरणारे तुमचे ‘कायम’ खेळाडू संघात स्थान टिकवू शकणार नाहीत, ही चिंता तुम्हाला सतावते आहे का? जर ईश्वर पांडेने बळी मिळवले तर संघातील नित्याच्या गोलंदाजांचे संघातील स्थान धोक्यात येईल. तुम्ही नेमके कशासाठी चिंतेत आहात,’’ असा सवाल गावस्कर यांनी केला.
‘‘काही खेळाडू अविरतपणे खेळत आहेत. विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्यांना काही काळ विश्रांती देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जर राखीव खेळाडूंना तुम्ही अशा वेळी संधी दिली नाही, तर ते केव्हा खेळणार,’’ असा प्रश्न गावस्कर यांनी केला. नुकत्याच झालेला न्यूझीलंड दौरा आणि आशिया चषक स्पध्रेसाठी पांडेचा भारताच्या एकदिवसीय संघात समावेश होता, परंतु त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील दोन सामन्यांत प्रभाव पाडू न शकणाऱ्या पुजाराला त्यानंतर संघात स्थान देण्यात आलेले नाही.
नाणेफेकीप्रसंगी कर्णधार विराट कोहलीने संघ कायम राखण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले. तो म्हणाला, ‘‘संघ कायम राखल्याने आत्मविश्वास मिळेल. या संघाला तुम्ही धीर द्यायला हवा. एकदिवसीय क्रिकेटचा विचार केल्यास आम्ही संक्रमण अवस्थेतून जात आहोत.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा