भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर आणि प्रसिद्ध तेलुगू अभिनेता नागार्जुन यांनासुद्धा बॅडमिंटन खेळाने मोहित केले आहे. इंडियन बॅडमिंटन लीग स्पर्धेतील ‘मुंबई मास्टर्स’ संघाचे हक्क या दोघांकडे असणार आहेत. संघाच्या मालकांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी व्यवस्थापक आणि उद्योगपती वंकिना चामुंडेश्वरनाथ यांचाही समावेश आहे.
‘‘बॅडमिंटन खेळासोबत नाते निर्माण झाल्याचा मला अतिशय अभिमान आहे. बॅडमिंटन मला मनापासून आवडते आणि नेहमीच खेळातील घडामोडी जाणून घेत असतो. या खेळाने भारताला बुजुर्ग खेळाडू दिले आहेत. इंडियन बॅडमिंटन लीगच्या निमित्ताने बॅडमिंटनप्रती मी भरीव योगदान देऊ शकेन,’’ असे सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल ५० खेळाडू आयबीएलमध्ये सहभागी होणार आहेत. मुंबई, पुणे, दिल्ली, लखनौ, हैदराबाद, बंगळुरू शहरांच्या सहा संघांत जेतेपदासाठी चुरस रंगणार आहे. प्रत्येक फ्रँचाइजींच्या शहरात दोन दिवस सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. अव्वल चार संघ उपांत्य फेरीत आगेकूच करणार आहेत. अंतिम लढत मुंबईला ३१ ऑगस्टला होणार आहे.
आयबीएल लिलाव पुन्हा लांबणीवर
नवी दिल्ली : बहुचर्चित इंडियन बॅडमिंटन लीग(आयबीएल) स्पध्रेसाठीचा खेळाडूंचा लिलाव तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आला आहे. यावेळी मात्र काही फ्रँचाइजींनी लिलावासाठी कार्यशाळा असावी अशी भूमिका मांडल्याने तो पुढे ढकलण्यात आला आहे. मूळ कार्यक्रमानुसार, खेळाडूंचा लिलाव ३० जूनला होणार होता. मात्र त्यानंतर १९ जुलै ही तारीख पक्की करण्यात आली. पण फ्रँजाइजींच्या विनंतीमुळे आता लिलाव २२ जुलैला होणार आहे.
‘‘लिलावासंदर्भातील तांत्रिक गोष्टी समजून घेण्यासाठी काही फ्रँचाइजींनी कार्यशाळेचे आयोजन व्हावे अशी सूचना केली होती. आयबीएलच्या कार्यकारिणी समितीने ही सूचना मान्य केली. त्यामुळे खेळाडूंचा लिलाव २२ जुलैला नवी दिल्लीत होणार आहे,’’ असे आयबीएलचे व्यावसायिक भागीदार आणि स्पोर्टी सोल्युशनने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. १४ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या आयबीएल स्पर्धेत एकूण ९० सामने होणार आहेत.
गुरुवारी जेमतेम सहा फ्रँचाइजी स्पष्ट झाले आहेत. या स्पध्रेला १४ ऑगस्टला प्रारंभ होणार आहे. प्रत्येक फ्रँचाइजीसमोर योग्य संघ, प्रशिक्षक आणि सहयोगी निवडीसाठी अत्यंत कमी कालावधी मिळणार आहे. संघांना १५० खेळाडूंची सूची पुरवण्यात आली आहे, मात्र यातून चीन आणि इंडोनेशियाच्या खेळाडूंची नावे नसल्याने फ्रँचाइजींचा उत्साह ओसरल्याचे वृत्त आहे.