मेलबर्न : भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी फलंदाजीला आल्यावर आधी सामन्याच्या परिस्थितीचा आणि पहिल्या अर्ध्या तासाचा आदर कर, असा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला सल्ला दिला आहे. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकली होती आणि यात पंतची भूमिका महत्त्वाची ठरली होती. मात्र, या वेळेस पंतला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. आतापर्यंतच्या पाच डावांत ३७, १, २१, २८, ९ अशाच धावा पंतला करता आल्या आहेत.
हेही वाचा >>> भारताचे क्रिकेट सामने आता जिओ सिनेमावर नाही दिसणार, काय आहे नेमकं प्रकरण?
आक्रमक पवित्रा ही पंतच्या फलंदाजीची ओळख आहे. दुसऱ्या कसोटीत फलंदाजीला आल्यावर त्याने वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडला पहिल्याच चेंडूवर पुढे येऊन टोलवले होते. मात्र, पंतने डावाच्या सुरुवातीला संयम राखणे आवश्यक आहे, असे गावस्करांना वाटते.
‘‘अन्य फलंदाजांप्रमाणेच पंतने फलंदाजीला आल्यावर किमान सुरुवातीचा अर्धा तास परिस्थितीचा अंदाज घेणे आणि त्याचा आदर करणे आवश्यक आहे. भारताची ३ बाद ५२५ अशी धावसंख्या असताना तो फलंदाजीला आणि त्याने पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ केला तर मी समजू शकतो. मात्र, पन्नाशीतच निम्मा संघ गारद झालेला असताना पंतने पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करणे योग्य नाही,’’ असे गावस्कर म्हणाले. ‘‘ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी या मालिकेत भारतीय फलंदाजांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. ते चेंडू विशिष्ट कोनातून टाकत आहे. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांनी पंतला विशेष अडचणीत टाकले आहे. बोलँड यष्टींच्या उजव्या बाजूने (राऊंड द विकेट) गोलंदाजी करत असल्यामुळे त्याच्याविरुद्ध धावा करणे अवघड जाते,’’ असेही गावस्कर यांनी म्हटले आहे.