Sunil Gavaskar Statement on India Defeat: भारतीय संघाने पर्थ कसोटी जिंकून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची विजयाने सुरुवात केली. मात्र, ऑस्ट्रेलियाने ॲडलेडमध्ये १० गडी राखून भारताला पराभूत करत शानदार पुनरागमन केले. या पराभवानंतर भारतीय दिग्गज सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला सल्ला दिला आहे.
ॲडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी लाजिरवाणी होती. भारताला दोन्ही डावांमध्ये १५० धावांचा टप्पा गाठता आला नाही. टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ १८० धावा तर दुसऱ्या डावात १७५ धावा करता आल्या. दिवस-रात्र कसोटीत भारतीय संघाच्या पराभवानंतर दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर संतापले आणि त्यांनी भारतीय संघाला चांगलंच फटकारल आहे. भारतीय संघाला एक सल्लाही दिला.
ॲडलेडमध्ये खेळली गेलेली दुसरी कसोटी तिसऱ्या दिवशीच संपली, त्यामुळे भारतीय संघाला २ दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेटपटूंना सरावासाठी हे २ दिवस वापरण्याचा सल्ला दिला आहे. तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका.
सुनील गावस्कर यांनी प्रसारकांना सांगितले की, “उर्वरित मालिकेकडे तीन सामन्यांची मालिका म्हणून पाहावे लागेल. जे झाले ते विसरून जा. उरलेल्या दिवसांत संघाने सराव करावा असे मला वाटते. हे फार महत्वाचे आहे. तुम्ही हॉटेलच्या रूममध्ये बसून राहू शकत नाही. तुम्ही इथे क्रिकेट खेळण्यासाठी आला आहात आणि तुम्हाला तेच करायचे आहे.”
गावस्कर पुढे म्हणाले, “तुम्हाला दिवसभर सराव करण्याची गरज नाही. तुम्ही सकाळ किंवा दुपारच्या सत्राचा सराव करू शकता, तुम्हाला हवा तो वेळ, पण हे दिवस वाया घालवू नका. जर कसोटी सामना पाच दिवस चालला असता, तर तुम्ही इथे कसोटी सामना खेळला असता.”