भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये गुरुवारपासून कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी शिखर धवन याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. तर धोनीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे हे दोघेही भारतात आहेत आणि आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत महेंद्रसिंग धोनी आणि शिखर धवन हे दोन खेळाडू स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये का खेळत नाहीत? असा रोखठोक सवाल माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केला आहे.
भारताचा सलामीवीर शिखर धवन ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिका खेळणार नाही. असे असतानाही तो देशांतर्गत कसोटी स्पर्धांमध्ये खेळत नाही. महेंद्रसिंग धोनीदेखील वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्यानंतर एकाही स्थानिक सामन्यात खेळलेला नाही. मात्र, हे दोघेही जानेवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामान्यांसाठी आपली संघातील दावेदारी सांगणार आहेत. अशा वेळी कामगिरीत सातत्य राखणे आणि आपल्या खेळात कायम सुधारणा आणणे यासाठी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणे गरजेचे असते. मात्र हे दोघे तसे करताना का दिसत नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित उपस्थित केला आहे.
‘BCCI ने सांगितले होते कि जे खेळाडू दौऱ्यावर जाणार नाहीत किंवा तंदुरुस्त नसतील त्यांना आंतरराष्ट्रीय संघात परतण्याआधी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळावे लागेल. पण तसे काहीच या दोघांकडून दिसत नाही. मग अशा वेळी निवड समिती कोणत्या आधारावर त्यांना स्थानिक स्पर्धांमधून सूट देत आहे? कोणत्याही खेळाडूला सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सतत सराव करणे गरजेचे असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामने नसतील, तेव्हा देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घ्यायला हवा, असा सल्ला त्याने दिला.
आता दोन महिने कोणताही सामना न खेळता या दोघांना थेट विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी दिली, तर जाणकारांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातील’, असेही सुनील गावसकर म्हणाले. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.