IND vs SA Sunil Gavaskar Slams South Africa: रविवारी डरबनमध्ये सततच्या पावसामुळे टीम इंडियाची प्रोटीज विरुद्ध मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट व्यवस्थापन बोर्डाला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. ऑस्ट्रेलियावर 4-1 असा शानदार विजय नोंदवल्यानंतर, सूर्यकुमार यादवची टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील पहिल्या सामन्यासाठी किंग्समीड स्टेडियमवर दाखल झाली होती. पण पावसाच्या संततधारेमुळे किंग्समीड येथे एकही चेंडू टाकल्याशिवाय पहिला सामना रद्द झाला.
CSA साठी या मालिकेतील प्रत्येक सामना हा महत्त्वाचा असणार आहे कारण, CSA चे मुख्य कार्यकारी असलेले फोलेत्सी मोसेकी यांनी सांगितल्याप्रमाणे पैशांची आकडेवारी जुळवण्यासाठी ‘भारताविरुद्ध मालिका’ ही नक्कीच मदत करू शकते. प्रक्षेपणाच्या अधिकारासाठीच CSA एक अब्ज रँड (53 दशलक्ष डॉलर्स) पेक्षा जास्त कमावण्याची अपेक्षा आहे.
पण इतकी मोठी संधी असूनही पहिलाच सामना रद्द झाल्यामुळे भारताचे माजी कर्णधार गावसकर यांनी CSA वर ऑन-एअर शाब्दिक हल्ला केला. नाणेफेकीच्या वेळीच पावसाचे आगमन झाले होते पण तरीही प्रोटिज बोर्डाने मैदान झाकले नाही. जर मैदान उघडं राहिलं आणि पाऊस थांबला, तर तुम्हाला माहिती आहे की तो आणखी एक तास सुरू होणार नाही. पण अचानक पुन्हा पाऊस पडला त्यामुळे खेळ झालाच नाही. प्रत्येकाला (क्रिकेट मंडळांना) भरपूर पैसे मिळत आहेत. कोणतीही चूक करू नका. सर्व क्रिकेट बोर्डांकडे भरपूर पैसा आहे. जर ते काही वेगळं सांगत असतील तर ते खोटं बोलत आहेत. त्यांच्याकडे बीसीसीआयइतके पैसे नसतील पण प्रत्येक बोर्डाकडे कव्हर खरेदी करण्यासाठीचे पैसे नक्कीच आहेत, असं गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितलं.
प्रोटिजमधील स्थितीवर टीका करताना गावसकर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष सौरव गांगुलीचाही विशेष उल्लेख केला. गावसकर पुढे म्हणाले की, “कोलकात्याचे ईडन गार्डन हे भारतातील एकमेव स्टेडियम आहे ज्यात पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज प्रणाली आहे. मंडळांना संपूर्ण मैदान कव्हर करता आले पाहिजे, कोणतीही सबब देऊन चालणार नाही. मला आठवतं की मला इडन गार्डन्सवरील टेस्ट मॅचला बोलावलं होतं तिथे काही अडचण आली होती आणि खेळ सुरू झाला नाही. पुढच्या सामन्यात, ईडन गार्डन्सवर संपूर्ण मैदान झाकलं होतं. तुम्हाला असाच निर्णय हवा होता. सौरव गांगुली हा प्रमुख होता आणि ईडन गार्डन्सकडे कोणीही बोट दाखवू शकणार नाही याची त्याने काळजी घेतली.”