भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विराट कोहलीकडे कर्णधारपद देण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. निवड समितीने विराट कोहलीची कर्णधारपदी नियुक्ती करण्याआधी कोणतीही चर्चा केली होती का? असा सवाल गावसकरांनी विचारला आहे. MID DAY या इंग्रजी वृत्तपत्रात लिहलेल्या कॉलममध्ये त्यांनी आपले विचार मांडले आहेत.
“आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ निवडायच्या आधी, निवड समितीने कर्णधारपदासाठी बैठक बोलावणं गरजेचं होतं. माझ्या माहितीनुसार, विश्वचषकापर्यंतच विराट कोहलीकडे कर्णधारपद होतं. विश्वचषकात विराटकडून ज्या अपेक्षा केल्या जात होत्या, त्याप्रमाणे त्याची कामगिरी झालेली नाही. संघातील काही खेळाडूंना खराब कामगिरीचं कारण देत जागा नाकारण्यात आली, मग विराटने त्याच्याकडून होत असलेल्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे का?” गावसकरांनी आपलं परखड मत मांडलं.
विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवानंतर, बीसीसीआय भारतीय संघाचं कर्णधारपद रोहित आणि विराटकडे विभागून देण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मर्यादीत षटकांच्या सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे तर कसोटी क्रिकेटचं नेतृत्व विराट कोहलीकडे देण्यात येणार होतं. मात्र निवड समितीने विंडीज दौऱ्यासाठी पुन्हा एकदा विराट कोहलीकडेच तिन्ही संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. ३ ऑगस्टपासून भारतीय संघाच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या दौऱ्यावर विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अवश्य वाचा – रोहित-विराटच्या मनोमीलनासाठी बीसीसीआयचा पुढाकार?