India vs England, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने पहिले सहा सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले असून भारत उपांत्य फेरीत खेळणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली फलंदाजीत भारतासाठी कमाल करत आहेत. लोकेश राहुलही जबरदस्त फॉर्मात आहे. सूर्यकुमार यादवनेही गरजेच्या वेळी उपयुक्त खेळी खेळली आहेत. त्याचवेळी जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी सुरुवातीपासूनच चेंडूवर चमकदार कामगिरी करत विकेट्स काढून दिल्या आहेत. सिराज-जडेजाही चांगले खेळत आहेत, पण मोहम्मद शमीने या विश्वचषकात वेगळ्याच प्रकारची गोलंदाजी केली आहे.
हार्दिकच्या दुखापतीनंतर शमीचा टीम इंडियात समावेश करण्यात आला असून त्याने केवळ दोनच सामन्यांमध्ये सर्वांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. शमीला या विश्वचषकातील पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने पाच विकेट्स घेत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शमीने लक्ष्याचा बचाव करताना चार विकेट्स घेतल्या.
मोहम्मद शमीच्या शानदार कामगिरीनंतर महान फलंदाज सुनील गावसकर यांनी एका मुलाखतीत त्याची तुलना महान अष्टपैलू कपिल देवबरोबर केली. गावसकरांनी शमीच्या फिटनेसचे कौतुक केले. ते म्हणाले, “त्याने खूप मेहनत घेतली आहे. जेव्हा तो मायदेशी परततो तेव्हा साहजिकच त्याने भरपूर खेळपट्ट्या बनवल्या होत्या आणि तो तिथे फक्त गोलंदाजी करतो, हेच प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वाचे आहे. तो त्याच्या वैयक्तिक क्रिकेट फिटनेसवर लक्ष केंद्रित करतो. हीच शमीची खासियत आहे. तो जिममध्ये जाणारा खेळाडू आहे की नाही, हे माहित नाही. तुम्ही दिवसभर जिम करू शकता. पण दिवसाच्या शेवटी तुम्ही किती गोलंदाजी करत आहात हे महत्त्वाचे आहे. मोहम्मद शमी अगदी तसाच आहे. तो सध्या जे कपिल देव करायचा ते तो करतोय. कपिल फक्त नेटमध्ये गोलंदाजी करत होता.”
शमीचे कौतुक करताना गावसकर पुढे म्हणाले, “तो तुमच्या सर्व बायो-मेकॅनिक्स तज्ञांचे ऐकत नाही जे म्हणतात ‘अरे नाही, नेटमध्ये फक्त १५-२० चेंडू टाकले पाहिजेत.’ शमीला माहित आहे की, एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याला त्याच्या पायांमध्ये खूप मायलेजची आवश्यकता आहे. तो गोलंदाजी करण्यासाठी किती मेहनत घेतो हे त्याच्या कामगिरीवरून दर्शवते. त्याचा गोलंदाजीचा रनअप खूप चांगला आहे. जेव्हा तो चेंडू हातात घेऊन धावतो तेव्हा त्याच्याकडे ड्रोन कॅमेरा असतो. त्यावेळी एखादा चित्ता किंवा बिबट्या शिकारीसाठी जात असल्याचे एक विलोभनीय दृश्य आपल्यासमोर उभे राहते.”
शमीने इंग्लंडविरुद्ध एक खास विक्रम केला
लखनऊ येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील कमी धावसंख्येच्या सामन्यात, वेगवान गोलंदाज शमीने जॉनी बेअरस्टो (१४), बेन स्टोक्स (०) आणि मोईन अली (१५) यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. आदिल रशीदला बाद करून शमीने ५० षटकांच्या विश्वचषकात सहाव्यांदा चार विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा शमी (६) आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (६) यांनी सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या आहेत.