IND vs NZ Sunil Gavaskar Dancing After India Win: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ९ महिन्यांत दुसरी ट्रॉफी जिंकली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने १२ वर्षांनंतर पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी ९ मार्चला खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने उत्कृष्ट गोलंदाजी आणि कर्णधार रोहित शर्माच्या दमदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. विजयानंतरचा सुनील गावस्करांचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

विजयानंतर आधी दोन्ही संघांना म्हणजेच उपविजेत्या न्यूझीलंडला मेडल देण्यात आले. त्यानंतर जेतेपद पटकावलेल्या भारतीय संघाला पांढरे जॅकेट देण्यात आले. यानंतर कर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाच्या वतीने ट्रॉफी स्वीकारण्यासाठी गेला आणि संपूर्ण संघ सहभागी झाला. भारतीय संघ एकिकडे ट्रॉफी स्वीकारत जल्लोष करत होता. तर दुसरीकडे सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनसाठी उपस्थित असलेले सुनील गावस्कर लहान मुलांसारखे नाचताना दिसले.

सुनील गावस्करांचा हा व्हीडिओ स्टार स्पोर्ट्सने शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये सुनील गावस्कर यांच्याबरोबर अँकर मयंती लँगर आणि भारताचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पादेखील उपस्थित होते. भारताला ट्रॉफी देतानाचा क्षण पाहताच सुनील गावस्कर अगदी लहान मुलांप्रमाणे नाचू लागले. जणू काही त्यांनाी सर्वच भारतीय चाहत्यांच्या आनंदाचं प्रितिनिधीत्त्व केलं. सुनील गावस्कर असेच टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये सीमारेषेजवळ नाचताना दिसले होते, जेव्हा विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला होता.

सुमारे ९ महिन्यांपूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने टी-२० विश्वचषक विजेतेपद जिंकून अनेक वर्षांचा दुष्काळ संपवला. त्या विजयाने केवळ प्रतीक्षाच संपली नाही तर टीम इंडियाची उत्कृष्ट कामगिरी करत राहण्याचा सिलसिला सुरूच राहिला. त्याचाच परिणाम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिसून आला. भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी करत आपले प्रत्येक सामन्यात योगदान दिले.

Story img Loader