Sunil Gavaskar upset with Virat’s shot: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या खराब बॅटिंगमुळे सुनील गावस्कर संतापले आहेत. पाचव्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी २८० धावा करायच्या होत्या आणि सात विकेट शिल्लक होत्या. पण, या सातही विकेट ७० धावांच्या आतच पडल्या आणि ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव करून डब्ल्यूटीसी कसोटी विजेतेपद पटकावले. यानंतर भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीवर सुनील गावस्कर संतापले. विशेषतः कोहली ज्या पद्धतीने बाद झाला त्यावर त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सुनील गावसकर विराट कोहलीच्या बाद होण्याबद्दल म्हणाले, “तो एक खराब शॉट होता. तुम्ही मला विचारत आहात की कोहलीने असा शॉट कसा खेळला. तो शॉट तो कसा खेळला हे तुम्ही त्याला विचारले पाहिजे. असे फटके खेळताना शतक कसे झळकावणार. फलंदाजी खरोखरच वाईट होती. आमचे फलंदाज ज्या प्रकारचे फटके खेळले, ते एका सत्रातही टिकले असते तर ती मोठी गोष्ट ठरली असती. तोपर्यंत कोहली ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू सोडत होता. त्याच्या मनात तो अर्धशतकापासून १ धाव दूर असण्याची शक्यता आहे. जेव्हा तुम्ही माइलस्टोनच्या जवळ असता तेव्हा हे घडते. हा प्रकार जडेजासोबतही घडला. ४८ धावांवर असतानाही त्याने असा चेंडू खेळला, जो त्याने खेळायला नको होता.”
शेवटच्या दिवशीची कामगिरी लाजिरवाणी –
गावसकर पुढे म्हणाले, “फलंदाजी खूप वाईट होती. शेवटच्या दिवशीची कामगिरी लाजिरवाणी होती. विशेषतः शॉट सिलेक्शन खराब होते. काल चेतेश्वर पुजाराने अतिशय खराब शॉट खेळला. त्यांच्याकडून अशी अपेक्षा करता येत नाही. कदाचित त्याच्या डोक्यात तो स्ट्राइक रेट, स्ट्राईक रेट असे ओरडत असेल. एका सत्रातच ७-८ विकेट पडल्या. तुम्ही अशा प्रकारे डब्ल्यूटीसी फायनल कशी जिंकू शकता?”
हेही वाचा – IND vs AUS: फायनलमधील पराभवानंतर सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित, अश्विनबाबत केले ट्विट
सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित केला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन्ही डावाच्या जोरावर भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात २३४ धावांवर गारद झाला.