Sunil Gavaskar Advice to Team India: ओव्हल येथे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपला पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर उभारला आहे. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली आहे. परंतु अजूनही भारतीय संघ ३१८ धावांनी मागे आहे. भारतीय संघाचे पहिले लक्ष्य फॉलोऑनची धावसंख्या पार करणे हे असेल, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
सुनील गावसकर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाले, “२००१ मध्ये जेव्हा राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी एवढी मोठी भागीदारी केली, तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी काय पाहिले. माफ करा, मी तुम्हाला (जस्टिन लँगर) आठवण करून देत आहे. त्यांनी जवळपास दोन दिवस फलंदाजी केली. त्यानंतर भारताने शेवटच्या दिवशी विजयासाठी पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियाला आऊट केले.”
मला वाटत नाही की ऑस्ट्रेलिया फॉलोऑन देईल –
गावसकर पुढे म्हणाले, “त्यानंतर भारताने शेवटची कसोटीही जिंकली. त्यामुळे मला वाटत नाही की, ऑस्ट्रेलिया फॉलोऑन देईल. भारताची फलंदाजी चांगली आहे. त्यांनी काही चुका केल्या आहेत. भारताकडे क्षमता आहे. ते काही चेंडू सोडत होते, बोल्ड होत होते. ईडन गार्डन्सवर जे घडले तसे ते काही धावा काढू शकले असते. शेवटच्या दिवशी चेंडू वळेल तेव्हा रवींद्र जडेजा काही जादू करू शकतो. त्यामुळे भारताचा पहिले लक्ष्य २६९ धावसंख्या पार करणे आहे. तसेच आघाडी शक्य तितकी कमी करण्याचा प्रयत्न करतील.”
भारतीय संघाचा पहिला डाव –
लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने पहिल्या डावात पाच गडी गमावून १५१ धावा केल्या आहेत. फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला २६९ धावा म्हणजे आणखी ११८ धावा करायच्या आहेत. सध्या अजिंक्य रहाणे नाबाद २९ धावा आणि श्रीकर भरत पाच धावांवर नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या आहेत. म्हणजेच भारतीय संघ अजूनही आपल्या धावसंख्येने ३१८ धावांनी मागे आहे.