आयपीएलचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरून बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमला हलविल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आता आणखी चिघळू लागली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) त्यानंतर पत्राद्वारे या निर्णयाविषयी जाब विचारला होता. मंगळवारी आयपीएल प्रशासकीय समिती यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) आयपीएलविषयक प्रभारी अध्यक्ष सुनील गावस्कर या पेचप्रसंगाबाबत मध्यस्थीची भूमिका बजावणार आहेत.
आयपीएल प्रशासकीय समितीच्या अंतिम निर्णयानंतरच एमसीए आपली भूमिका स्पष्ट करेल, असे सोमवारी झालेल्या एमसीए कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये रणनीती ठरवण्यात आली आहे.
‘‘कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये अंतिम सामना बंगळुरूला हलविण्याच्या निर्णयाबाबत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. या दरम्यान आम्ही बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासकीय समितीकडे आमची बाजू मांडली आहे. एमसीएच्या पत्राबाबत आम्ही मंगळवारी होणाऱ्या आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीत चर्चा करू, असे गावस्कर यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे,’’ अशी माहिती एमसीए उपाध्यक्ष रवी सावंत यांनी दिली.
शनिवारी आयपीएल प्रशासकीय समितीने आयपीएलचा १ जूनला होणारा अंतिम सामना मुंबईहून बंगळुरूला हलवण्याचा निर्णय घेत जोरदार धक्का दिला. याबाबत स्पष्टीकरण देताना बीसीसीआयने म्हटले होते की, ‘‘आयपीएलच्या यंदाच्या हंगामतील २० सामने परदेशात खेळवण्यात आले. या पाश्र्वभूमीवर प्ले-ऑफचे सामने आणखी काही वेगळ्या स्टेडियमवर व्हावे, असा प्रशासकीय समितीच्या बठकीत निर्णय घेण्यात आला. प्ले-ऑफचे सामने आयोजित करण्यासाठी अनेक असोसिएशन्सनी आपली उत्सुकता प्रकट केली.’’
त्यानंतर या निर्णयाबाबत विचारणा करणारे पत्र एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयपीएल प्रशासकीय समिती आणि बीसीसीआयच्या सर्व सदस्यांना पाठवले होते. अंतिम सामना बंगळुरूला स्थलांतरित करण्याचे खरे कारण काय हे सर्वासमोर येऊ दे, अशी मागणी पवार यांनी पत्रात केली होती. याचप्रमाणे शनिवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना संपल्यावर एमसीएच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली ओळखपत्रे बीसीसीआयला परत केली होती. ‘‘अंतिम सामन्याबाबतचा निर्णय आम्हाला कोणतेही कारण न देता घेण्यात आला. त्यामुळे एमसीएचे पदाधिकारी आणि अन्य सहाय्यक नाराज झाले आहेत. म्हणूनच आम्ही आमची ओळखपत्रे परत केली,’’ असे एमसीएचे कोषाध्यक्ष विनोद देशपांडे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा