Sunil Gavaskar on New Team India: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. अंतिम फेरीत भारतीय फलंदाजांची चांगलीच त्रेधातीरपिट उडाली. ना फलंदाजी चांगली झाली ना गोलंदाजी त्यामुळे संघाला दोन्ही डावात ३०० धावांपर्यंत मजल देखील मारता आली नाही. गेल्या काही वर्षांत परदेशातील मधल्या फळीची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. आता माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
सुनील गावसकर यांनी आताचे खेळाडू खूप गर्विष्ठ आहेत असे ते म्हणाले. ते म्हणाले की, “त्यांना दुसऱ्याकडे मदत मागायला आवडत नाही कारण त्यांचा अहंकार आड येतो. सचिन तेंडुलकरपासून ते राहुल द्रविडपर्यंत त्यांच्यातील कमतरता जाणून घेण्यासाठी माझ्याकडे यायचे, पण गेल्या ५-१० वर्षांपासून एकही फलंदाज त्यांच्यातील समस्या, होणाऱ्या चुका, कमतरतांबद्दल माझ्याकडे आला नाही. सचिन, द्रविड आणि लक्ष्मण यांनी सल्ला हा अहंकार बाजूला ठेवून मागितला.”
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर पुढे म्हणाले की, “राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण जेव्हा खेळायचे तेव्हा मला ते नियमित भेटायचे. ते त्यांच्या समस्यांबद्दल बोलायचे. याबरोबरच ते हेही जाणून घ्यायचे होते की, जर त्यांना काही उणीवा दिसल्या असतील तर त्याबद्दलही सांगायचे. मात्र गेल्या काही वर्षांत एकाही भारतीय फलंदाजाने त्यांच्या समस्येबाबत माझ्याशी संपर्क साधला नाही. कारण, त्यांचा अहंकार आड येतो.” गावसकर यांनी वीरेंद्र सेहवागबद्दलचा एक प्रसंगही सांगितला.
मी सेहवागला बोलावले होते- गावसकर
सुनील गावसकर यांनी सेहवागबद्दलचा एक किस्सा सांगितला. लिटल मास्टर म्हणाले की, “एकदा अचानक मी वीरेंद्र सेहवागला फोन केला. त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. त्याचा फॉर्म त्यावेळी खूप खराब चालला होता. मी त्याला सांगितले की वीरू तू तुझा ऑफ स्टंप गार्ड पाहिला आहेस?” त्यावेळी गावसकरांनी त्याला विचारले. तो म्हणाला, “का सनी भाई?” पुढे गावसकर यांनी सेहवागला समजावून सांगितले की, “तू चांगल्या फूटवर्कसाठी ओळखला जात नाही. कधी कधी तू आऊट होत असताना, तुला बॉलची कल्पना नसते आणि त्यामुळे तू त्यापासून दूर राहतो. कदाचित जर तू ऑफ स्टंपचे रक्षण केले, तो कुठे आहे हे पाहून जर खेळलास तर तुला लगेच कळेल की चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे की आत. इथेच प्रशिक्षक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मात्र, आताचे खेळाडू प्रश्नही विचारत नाहीत आणि प्रशिक्षक त्यावर उत्तरही देत नाहीत.”
सामन्यात काय झाले?
भारतीय संघ आता नव्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला १२ जुलैपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना डॉमिनिका येथे सुरु आहे. रोहित आणि यशस्वी यांनी पहिल्या डावात भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी काही अप्रतिम फटके मारले आणि कोणतीही चूक केली नाही. यशस्वी ७३ चेंडूत ४० धावा करून नाबाद आहे. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार मारले आहेत. त्याचबरोबर रोहितने ६५ चेंडूत ३० धावा केल्या आहेत. त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. भारत पहिल्या डावात वेस्ट इंडिजपेक्षा ७० धावांनी पिछाडीवर आहे आणि दुसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, सामन्यात पुनरागमन करण्यासाठी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना कसरत करावी लागणार आहे.