Sunil Gavaskar on Lakshya Sen Paris Olympics 2024 Defeeat : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचं पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. तो या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. मात्र उपांत्य फेरी आणि त्यापाठोपाठ कांस्य पदकाच्या सामन्यात तो पराभूत झाल्यामुळे त्याला देशासाठी पदक जिंकता आलं नाही. मात्र तो उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला ही गोष्ट देखील काही लहान नाही. त्याच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी देखील लक्ष्यवर स्तुतीसुमने उधळली आहेत. मात्र त्यांनी लक्ष्यच्या खेळातील उणीव देखील अधोरेखित केली आहे. ते म्हणाले, “लक्ष्यकडे विश्वविजेता बनण्याचे सर्व गुण आहेत. मात्र पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक हुकल्यानंतर त्याला मानसिक प्रशिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गावसकर म्हणाले, “उपांत्य फेरी व कांस्य पदकाच्या सामन्यात त्याने सुरुवात चांगली केली होती. दोन्ही सामन्यात पहिल्या फेरीनंतर तो आघाडीवर होता. मात्र, सुरुवातीला मिळालेली आघाडी त्याला कायम राखता आली नाही. हे एखाद्या मानसिक समस्येमुळे झालंय का? तसं असेल तर त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.”

माजी भारतीय क्रिकेटपटू म्हणाले, “लक्ष्य सेन कसा काय पराभूत झाला, याचं आश्चर्य प्रकाश पदूकोन (माजी बॅडमिंटनपटू) यांनी देखील व्यक्त केलं. ते म्हणाले, कधीतरी असं होऊ शकतं की सामना तुमच्या हातून निसटतो. आपल्याबरोबर नेहमीच असं होतं”. गावसकर म्हणाले, “लक्ष्य सेनने सामन्यावरील पकड कशी काय गमावली याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मी कुठेतरी वाचलं की प्रकाश पदूकोन म्हणाला, लक्ष्यला माईंड ट्रेनिंगकडे (मानसिक प्रशिक्षण) लक्ष द्यावं लागेल.”

हे ही वाचा >> Paris Paralympics 2024: भारताचा सुवर्णपदक विजेता बॅडमिंटन खेळाडू निलंबित, CAS ने याचिका फेटाळल्याने पॅरिस पॅरालिम्पिकचं स्वप्न भंगलं

सुनील गावसकरांचं परखड भाष्य

विक्टर अ‍ॅक्सेलसनविरोधात उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्यच्या पराभवाबाबत गावसकर यांनी स्पोर्ट्स्टारवर एक स्तंभ लिहिला आहे. यामध्ये गावसकर यांनी म्हटलं आहे की “उपांत्य सामन्यात २०-१७ व ७-० अशी आघाडी लक्ष्यकडे होती. मात्र ती आघाडी त्याने गमावली. सामन्याची पहिली फेरी सहज जिंकूनही त्याने सामना गमावला. त्यानंतर कांस्य पदकाच्या सामन्यात ली जी जियाविरोधात लक्ष्यचा पराभव खूप त्रासदायक ठरला. माझ्यासह अनेकांना तो पराभव पचवता आला नाही. त्याने विमल कुमार, BAI आणि सरकारच्या TOPS बरोबर मिळून सर्व प्रकारचे प्रयत्न केले होते. परंतु, आव्हानात्मक वेळ आली तेव्हा लक्ष्य मागे राहिला. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या शब्दात सांगायचं झाल्यास अडचणीच्या काळात तो गार्डनमध्ये फिरणाऱ्यांसारखा (गार्डन में घुमने वाले) होता.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar mentions lakshya sen garden mein ghoomne wala on olympics 2024 defeat asc