Vinod Kambli: एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवणारा भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात आहे. खराब आरोग्य, आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक संघर्षाशी तो झुंज देत आहे. पण या कठीण काळात माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी त्याला दिलासा देत दर महिन्याला ३० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या वर्षी विनोद कांबळीला युरीन इन्फेक्शन आणि अंगावर पेटके आल्याने एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी विनोद कांबळीची आर्थिक परिस्थितीही बिकट असल्याचे समोर आले होते. त्यानंतर मुंबईतील एका कार्यक्रमात गावसकर यांनी कांबळीला मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, गावसकर यांनी त्यांच्या चॅम्प्स फाउंडेशनच्या माध्यमातून विनोद कांबळीला मदत करण्यास सुरुवात केली आहे. गावसकर चॅम्प्स फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मदत करतात. १९९९ मध्ये सुरू झालेल्या या फाउंडेशनने कांबळीला कठीण काळात आर्थिक मदत केली आहे. १ एप्रिलपासून त्याला चॅम्प्स फाउंडेशनच्या माध्यमातून आयुष्यभर मासिक ३०,००० रुपये आर्थिक मदत मिळेल. या व्यतिरिक्त त्याच्या वैद्यकीय खर्चासाठी दरवर्षी ३०,००० रुपये देखील दिले जातील.

गावस्कर यांचे जवळचे मित्र आणि निर्लॉन संघातील सहकारी अनिल जोशी यांनी खुलासा केला की, वानखेडे स्टेडियमवर विनोद कांबळीला भेटल्यानंतर गावसकर यांनी विनोद कांबळीच्या डॉक्टरांची भेट घेतली होती. त्यानंतर फाउंडेशनला कांबळीला वैद्यकीय उपचारांसाठी निधी देण्याच्या सूचना केल्या होत्या.

“गेल्या वर्षी कांबळीची तब्येत बिघडल्याचे कळताच गावसकर यांना त्याला मदत करायची इच्छा होती. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्यांच्या भेटीच्या एक दिवसानंतर, गावसकर आणि मी कांबळीच्या दोन डॉक्टरांची भेट घेतली. त्याच्या प्रकृतीची पूर्ण माहिती घेतल्यानंतर, त्यांनी चॅम्प्स फाउंडेशनला तातडीने आर्थिक आणि वैद्यकीय मदत सुरू करण्याचे निर्देश दिले,” असे अनिल जोशी यांनी सांगितल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान विनोद कांबळीला गेल्या काही वर्षांत अनेक आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. यापूर्वी २०१३ मध्ये जवळचा मित्र सचिन तेंडुलकरच्या आर्थिक मदतीने त्याच्यावर दोन हृदय शस्त्रक्रियाही झाल्या आहेत.

विनोद कांबळी त्याच्या आंतरराष्ट्री कारकिर्दीत भारतासाठी १०४ एकदिवसीय आणि १७ कसोटी सामने खेळला आहे.