वृत्तसंस्था, सिडनी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराने गोलंदाज आणि कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर फार प्रभावित झाले आहेत. रोहित शर्माच्या भवितव्याबाबत प्रश्न असल्याने भारताने आता पुढील कर्णधाराचा विचार करण्याची आवश्यकता असून यासाठी बुमराच प्रमुख दावेदार असल्याचे गावस्कर यांना वाटते.

‘‘भारतीय संघाचा पुढील कर्णधार म्हणून बुमराचा सर्वप्रथम विचार केला जाईल असा माझा अंदाज आहे. तो या पदासाठी प्रमुख दावेदार असेल. पुढे येऊन निर्णय घेण्याची बुमरामध्ये क्षमता आहे. त्याचे संघातील अन्य खेळाडूंशी चांगले जुळते. तो स्वत:सुद्धा उत्कृष्ट कामगिरी करत आहे. शिवाय नेतृत्वाचे तो फार दडपण घेतो असे जाणवत नाही. यशस्वी कर्णधाराला आवश्यक सर्व गुण बुमरामध्ये आहेत,’’ असे गावस्कर म्हणाले.

प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला हार पत्करावी लागली. मात्र, बुमराने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना पाच सामन्यांच्या नऊ डावांत सर्वाधिक ३२ गडी बाद केले. भारताने या मालिकेतील एकमेव सामना बुमराच्या नेतृत्वाखालीच जिंकला होता.

हेही वाचा >>>Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया दुबईत खेळणार सराव सामना?

‘‘काही कर्णधार असे असतात जे आपल्या संघातील खेळाडूंवर बरेच दडपण टाकतात. मात्र, बुमराचे तसे नाही हे बाहेरून बघताना जाणवते. संघ व्यवस्थापनाकडून प्रत्येक खेळाडूला ठरावीक भूमिका दिलेली असती. त्या-त्या खेळाडूने दिलेली भूमिका चोख बजावावी अशी बुमरा अपेक्षा करतो. त्यामुळे खेळाडू अधिक मोकळेपणाने खेळतात,’’ असे गावस्कर म्हणाले.

‘‘गेल्या काही वर्षांपासून भारतीय गोलंदाजांचे बुमराच नेतृत्व करत आहे. सामन्यादरम्यान तो गोलंदाजांच्या शेजारी म्हणजेच मिड-ऑफ किंवा मिड ऑनला उभा राहतो. तो त्यांना मार्गदर्शन करतो, महत्त्वपूर्ण सल्ले देतो. ऑस्ट्रेलियात त्याने केलेली कामगिरी अविश्वसनीयच होती. त्यामुळे लवकरच त्याची पूर्णवेळ कर्णधार म्हणून निवड झाल्यास मला जराही आश्चर्य वाटणार नाही,’’ असे गावस्कर यांनी नमूद केले.

अतिरिक्त दडपण नको कैफ

बुमराला पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्त करण्यापूर्वी ‘बीसीसीआय’ने बराच विचार करायला हवा, असे मत माजी कसोटीपटू मोहम्मद कैफने मांडले. ‘‘बुमराने केवळ बळी मिळवण्यावर आणि तंदुरुस्त राहण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्याच्यावर अतिरिक्त दडपण टाकता कामा नये. केवळ आतापुरता विचार करून बुमराकडे नेतृत्व देण्यात आल्यास याचा त्याच्या कारकीर्दीवर विपरीत परिणाम होऊ शकेल,’’ असे कैफ म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar opinion on bumrah being a contender for the captaincy sport news amy