भारतीय क्रिकेट संघाच्या वरिष्ठ खेळाडूंच्या विश्रांती घेण्यावरून भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्याकडून वरिष्ठ खेळाडूंची कान उघडणी करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये न थकता खेळता मग देशासाठी खेळायच्या वेळी मात्र विश्रांती का हवी, असा प्रश्न सुनील गावसकर यांनी विचारला आहे.
भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि पाच टी-२० सामनेदेखील खेळण्यात येणार आहे. मात्र, या दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहीत शर्मा, जसप्रित बुमराह, हार्दिक पंडया आणि रिषभ पंत यांनी या वरिष्ठ खेळाडूंनी विश्रांती मागितली आहे. यावरून सुनील गावसकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हेही वाचा – वयाच्या ८१ व्या वर्षी ‘या’ माजी आमदाराने भारतासाठी World Athletics Championship स्पर्धेत जिंकली दोन पदकं
”विश्रांती धोरणाचे मी समर्थन करत नाही. तुम्ही आयपीएल खेळताना विश्रांती घेत नाही. मग भारतासाठी खेळताना तुम्ही विश्रांती का मागता? तुम्हाला भारतासाठी खेळावेच लागेल.”, असे सुनील गावसकर यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ”टी-२० सामन्यात तुम्हाला २० ओव्हर खेळावे लागतात. त्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा जास्त ताण पडत नाही. त्यामुळे बीसीसीआयने विश्रांती धोरणावर लक्ष द्यायला हवे”
विराट कोहली, रोहीत शर्मा, जसप्रित बुमराह, हार्दिक पंडया आणि रिषभ पंत खेळाडूंनी विश्रांती घेतल्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शिखर धवनकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी भारतासाठी ही एकमेव मालिका असणार आहे.
हेही वाचा – कोहलीच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करणे चुकीचे -रोहित