भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी उमरान मलिकची संघात निवड करण्यात आली आहे, परंतु त्याला अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही. उमरान आणि अर्शदीप यांची आयपीएल २०२२ मधील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली होती, पण दोघेही अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये पोहोचलेले नाहीत. मात्र भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी उमरानचे जोरदार कौतुक केले आहे. शेवटच्या वेळी ज्या क्रिकेटपटूची खेळी पाहून खूप आनंद झाला तो सचिन तेंडुलकर होता आणि आता उमरान आहे, असे गावसकर यांनी म्हटले आहे.
स्टार स्पोर्ट्स वर एका कार्यक्रमादरम्यान, गावसकर म्हणाले की, “शेवटच्या वेळी भारतीय ज्या खेळाडूला पाहून मी खरोखर उत्साहित झालो होतो, तो सचिन तेंडुलकर होता आणि आता वेगवान गोलंदाज उमरान मलिककडूनही अशीच अपेक्षा आहे. मला खात्री आहे की त्याने खेळावे. पण मला वाटते की भारतीय संघाला आधी तिसरा सामना जिंकून नंतर खेळण्याची संधी द्यायला आवडेल. भारतीय संघ ज्या परिस्थितीत आहे, त्याला प्रयोग करण्याची फारशी इच्छा नाही.”
भारताचा आफ्रिकेवर ४८ धावांनी विजय; मालिकेतील आव्हान शाबूत; चहल, पटेल चमकले
आयपीएलच्या मोसमात पहिल्याच मोसमात उमरानने त्याच्या तीव्र वेग आणि विकेट घेण्याच्या क्षमतेने चांगली छाप सोडली. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने १४ सामन्यांत २२ विकेट घेतल्या आणि मोसमातील चौथा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. बरेचदा १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करुन उमरानने चाहत्यांना आनंदित केले होते.
दरम्यान, मंगळवारी झालेल्या सामन्यात सलामीवीर ऋतुराज गायकवाड (३५ चेंडूंत ५७ धावा) आणि इशान किशन (३५ चेंडूंत ५४ धावा) यांच्या अर्धशतकांनंतर हर्षल पटेल (२५ धावांत ४ बळी) आणि यजुर्वेद्र चहल (२० धावांत ३ बळी) यांच्या गोलंदाजीच्या जोरावर मंगळवारी भारताने तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ४८ धावांनी विजय मिळवत मालिकेतील आव्हान टिकवले. गेल्या दोन सामन्यांत फारशी चमक न दाखवणाऱ्या गोलंदाजांनी या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली.