काही दिवसापूर्वी विराट कोहलीने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये फोटोमधील व्यक्ती कोहलीचा लुक करून इतरांना खोटे पुमाचे शूज विकत होता. त्यामुळे कोहलीने यासंदर्भात तक्रार करून पुमाला या प्रकरणी लक्ष घालण्याचा सल्ला दिला होता. अशात आता सुनील गावस्कर यांनी देखील आपल्या बाबतीत घडलेल्या एका घटनेचा खुलासा केला आहे.
लिटल मास्टर म्हणून प्रसिद्ध असलेले हे जगातील दिग्गज फलंदाजांमध्ये गणले जातात. या खेळाडूने आपल्या काळात अनेक मोठे विक्रम केले होते, जे आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. हा एकमेव टीम इंडियाचा फलंदाज आहे, ज्याने त्याच्या काळात एका वर्षात हजाराहून अधिक धावा केल्या होत्या. या सगळ्यामध्ये आता सुनील गावस्कर यांनी एक मोठा खुलासा केला आहे.
सुनील गावस्कर म्हणाले, “माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात वापरकर्त्यावर कोणतेही दायित्व न ठेवता नाव कसे वापरले जाऊ शकते, याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला होता. माझे नाव वापरणाऱ्या काही बॅट निर्मात्यांच्या बाबतीत हे होते. त्यात मुद्दाम माझ्या नावाचे स्पेलिंग थोडे वेगळे लिहले जायचे. माझ्या नावाचे स्पेलिंग चुकीचे लिहून ही बॅट माझी स्वाक्षरी म्हणून विकली जात होती.”
गावस्कर पुढे म्हणाले, ”अर्थात त्यावर माझी स्वाक्षरी नव्हती. नावाचे स्पेलिंग वेगळे आणि स्वाक्षरी वेगळी होती. त्यामुळे कायदेशीररित्या मी यावर काहीही करू शकत नव्हतो. तसेच मला सल्ला देण्यात आला होता की, असे करणे वेळेचा अपव्यय होईल. कारण अशा बॅटची जास्त विक्री होत नाही.”
सुनील गावस्कर यांना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना मैदानात चौफेर फटके मारायला आवडायचे. १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या मालिकेत त्यांनी ७७४ धावा केल्या आणि त्या मालिकेत एकट्याने इतक्या संस्मरणीय खेळी खेळल्या होत्या की त्यांची यादी बनवता येईल. त्याचबरोबर त्यांच्या बॅटमधून या मालिकेत द्विशतक निघाले होते.