Sunil Gavaskar questions Rohit Sharma’s decision: भारतीय संघ लंडनमधील ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हबद्दल एक मोठा निर्णय घेत चकीत केले. रोहित शर्माने आर आश्विनच्या वगळत रवींद्र जडेजाची एक फिरकी गोलंदाज म्हणून निवड केली. यावर भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी रोहित शर्माच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
रोहित शर्माने भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार वेगवान गोलंदाजांना प्राधान्य दिले. यावर भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर भारतीय कर्णधार रोहित शर्मावर नाराज असल्याचे दिसून आले. त्यांनी रोहित शर्माच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच आता संघ व्यवस्थापनावर सातत्याने उपस्थित केले जात आहेत. अश्विन सध्याच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला गोलंदाज आहे.
रोहितचा निर्णय अनाकलनीय – सुनील गावसकर
दरम्यान, समालोचन करताना सुनील गावसकर म्हणाले, “ऑस्ट्रेलिया संघात पाच डावखुरे फलंदाज आहेत. यात डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मिचेल स्टार्क आणि अॅलेक्स कॅरी यांचा समावेश आहे. यानंतरही तुमच्या संघात एकही ऑफस्पिनर नाही. असे का? हा निर्णय अनाकलनीय आहे.” तसेच सोबत समालोचन करत असलेल्या हरभजन सिंगने अनुभवी गावसकरांच्या मताशी सहमती दर्शवली. त्याचबरोबर सौरव गांगुल आणि रिकी पाँटिगनेही हाच प्रश्न उपस्थित केला आहे.
सौरव गांगुली काय म्हणाला?
पहिले सत्र संपल्यानंतर सौरव गांगुली स्टार स्पोर्ट्स शोमध्ये म्हणाला, “बघा, नंतरची गोष्ट आहे की सामन्याचा निकाल काय लागेल? मी नंतरच्या विचारांवर विश्वास ठेवत नाही. एक कर्णधार म्हणून, तुम्ही नाणेफेकीपूर्वी ठरवा की प्लेइंग इलेव्हन काय असेल आणि भारताने चार वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षांत भारताला ४ वेगवान गोलंदाजांसह यश मिळाले, असे बोलले जात आहे, पण जर मी कर्णधार असतो, तर अश्विनसारख्या दर्जेदार फिरकीपटूला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवणे माझ्यासाठी खूप कठीण झाले असते.”
हेही वाचा – WTC final IND vs AUS: सौरव गांगुलीलाही आवडला नाही रोहित शर्माचा ‘हा’ निर्णय; म्हणाला, “मी कर्णधार असतो तर…”
जडेजापेक्षा अश्विन डावखुऱ्या फलंदाजांना जास्त त्रास देतो – रिकी पाँटिग
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना रिकी पाँटिग म्हणाला, “भारताने सामन्याच्या पहिल्या डावासाठी फक्त गोलंदाजी आक्रमण निवडण्याची चूक केली. ऑस्ट्रेलियात संघांत अनेक डावखुरे फलंदाज आहेत. जडेजापेक्षा अश्विन डावखुऱ्या फलंदाजांना जास्त त्रास देतो. मला खेळपट्टीवर गवत दिसले. हो गवत होते, पण खोलवर पाहिल्यावर मला ते सुकलेले दिसत होते.”