Sunil Gavaskar upset over India’s defeat : भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एक डाव आणि ३२ धावांनी पराभूत झाला. आजपर्यंत टीम इंडियाला आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकता आलेली नाही आणि यावेळीही भारताचे हे स्वप्न केवळ स्वप्नच राहिले. यजमान आफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी हरल्यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी टीम इंडियावर जोरदार टीका केली. अनुभवी गावसकर म्हणाले की, टीम इंडियाने येथे सराव सामना खेळायला हवा होता. ‘इंट्रा स्क्वॉड’ सामने हा एक विनोद आहे.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, भारतीय संघाने येथे सराव सामने खेळायला हवे होते. तुम्ही थेट कसोटी सामने खेळू शकत नाही. सराव सामने न खेळल्याने तुमचे नुकसान झाले आहे. भारत अ बाबतही ते म्हणाले की, संघाने दौऱ्यापूर्वी काही दिवस अगोदर येथे यावे. टीम इंडियाच्या पराभवाने अनुभवी गावसकर खूपच नाराज दिसले.
सुनील गावसकर म्हणाले, ‘जेव्हाही टीम इंडिया ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाते, तेव्हा त्यांच्यासाठी कसोटी सामन्यांपूर्वी सराव सामने खेळणे खूप महत्त्वाचे असते. टीम इंडियाला परदेशात कसोटी मालिका जिंकायची असेल, तर युवा क्रिकेटपटूंना जास्तीत जास्त सराव सामने मिळायला हवेत. तुम्ही वरिष्ठ क्रिकेटपटूंना एक किंवा दोन दिवस आधी संघात सामील होण्याची परवानगी देऊ शकता, परंतु भारत अ चे सामने मोठ्या मालिकेपूर्वी आयोजित केले जावेत आणि या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची कसोटी मालिकेसाठी निवड करावी.’
इंट्रा-स्क्वॉड सामने हा विनोद आहे – गावसकर
सुनील गावसकर पुढे म्हणाले, ‘येथे आल्यानंतर तुम्हाला सराव सामने खेळण्याची गरज आहे. इंट्रा-स्क्वॉड सामने हा एक विनोद असतो, तुमचे वेगवान गोलंदाज तुमच्या फलंदाजांना खूप वेगवान गोलंदाजी करतात का, ते बाऊन्सर टाकतील का, कारण त्यांना त्यांच्या फलंदाजांना दुखापत होण्याची भीती असते.’ भारताचा दुसरा कसोटी सामना ३ जानेवारीला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.