बीसीसीआयने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या दुस-या सायकलच्या फायनलसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ७ जूनपासून इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारतीय संघात निवड झालेल्या सर्वात आश्चर्यकारक खेळाडूचे नाव म्हणजे अजिंक्य रहाणे. वास्तविक, रहाणे जानेवारी २०२२ पासून कसोटी संघाबाहेर आहे. मात्र, तो त्याच्या विस्फोटक फलंदाजीने आयपीएल २०२३ मध्ये खूप चर्चेत आला आहे. याशिवाय रणजी ट्रॉफीच्या २०२२-२३ हंगामातही त्याने आपली छाप सोडली होती.
भारताचे माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज सुनील गावसकर यांनी ‘बीसीसीआय रहाणेवर अवलंबून का आहे?’ या प्रश्नाचे स्टार स्पोर्ट्स शो क्रिकेट लाइव्हमध्ये उत्तर देताना म्हणाले, “भारतीय संघात हा एकमेव बदल आवश्यक होता. श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीने त्रस्त असल्याने त्याचा बदली खेळाडू म्हणून फक्त अजिंक्य रहाणे हाच त्यांच्यासमोर पर्याय होता. आयपीएलमधील फॉर्ममुळे अजिंक्य रहाणेची WTC संघात निवड झाली नाही. खरे तर रणजी ट्रॉफीमध्ये तो चांगलाच फॉर्मात होता. देशांतर्गत हंगामात त्याने मुंबईसाठी चांगली कामगिरी केली. आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळणार हा प्रश्न आहे. अंतिम फेरीतील सामन्यात यष्टीरक्षक के. एस. भरत किंवा के.एल. राहुल यापैकी कोण असणार? त्यासाठी आपल्याला वाट पहावी लागेल.”
गावसकर यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतासाठी आपली खास प्लेइंग इलेव्हन निवडली. यात त्यांनी रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांची सलामीवीर म्हणून निवड केली. त्यांनी चेतेश्वर पुजाराला तिसऱ्या तर कोहलीला चौथ्या क्रमांकावर ठेवले. लिटिल मास्टर यांनी अजिंक्य रहाणेला प्लेईंग ११मध्ये स्थान देत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सजेस्ट केले. तसेच, त्यांनी के. एल. राहुलला सहाव्या क्रमांकावर निवडले असून राहुलचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून समावेश केला. पुढे त्यांनी अक्षर पटेलला त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आणि रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन या दोन अनुभवी फिरकीपटूंना पहिले प्राधान्य दिले. गावसकर यांनी जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली.
सुनील गावसकर प्लेईंग ११: रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
WTC फायनलसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट