IND vs ENG Sunil Gavaskar slam KL Rahul : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला गुरुवारी नागपुरात सुरुवात झाली. या सामन्यात भारताने इंग्लंडचा ४ विकेट्सनी पराभव मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताला २४९ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने ३८.४ षटकांत ६ गडी गमावत २५१ धावा केल्या आणि सामना जिंकला. या सामन्यात केएल राहुल शुबमन गिलच्या शतकासाठी मदत करण्याच्या नादात बाद झाला, ज्यामुळे त्याला सुनील गावस्करांनी फटकारले.
सुनील गावस्कर काय म्हणाले?
माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर केएल राहुलच्या छोट्या खेळीबद्दल खूश नव्हते, कारण त्यांचा असा विश्वास होता की नागपूर येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याचा सहकारी शुभमन गिलला शतक झळकावण्यासाठी तो प्रयत्न करत होता. मात्र, या नादात तो स्वत: बाद झाला. त्यानंतर शुबमन गिलही झेलबाद झाला, ज्यामुळे त्याचे शतक हुकले.
शुबमन गिलच्या शतकासाठी केएल राहुल सावकाश खेळत होता. त्यावेळी समालोचन करताना सुनील गावस्कर म्हणाले, “केएल राहुलने असे न खेळता त्याचा त्याचा नैसर्गिक खेळ खेळला पाहिजे. तो शुबमनचे शतक पूर्ण व्हावे, यासाठी सावकाश खेळून मदत करत आहे.” सुनील गावस्कर हे ३६ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूनंतर म्हणाले होते.
गावस्कर केएल राहुलवर संतापले –
यानंतर पुढच्याच चेंडूवर केएल राहुल झेलबाद झाला. आदिल रशीदने आपल्याच गोलंदाजीवर त्याचा सोपा झेल घेतला. त्यानंतर सुनील गावस्कर चांगलेच संतापले. सुनील गावस्कर पुढे म्हणाले, “बघा काय झालं. याबद्दलच मी बोलत होतो. हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे तुम्हाला ते करण्याची गरज नाही. तो त्याच्या जोडीदाराने शतक पूर्ण करावे, यासाठी बॉल टॅप करण्याचा प्रयत्न करत होता. हा एक अर्धवट मनाने खेळलेला शॉट होता, ज्यामुळे तो बाद झाला.”
केएल राहुल ९ चेंडूंत अवघ्या दोन धावा करुन बाद झाला. विशेष म्हणजे यानंतर शुबमन गिल देखील बाद झाला आणि त्याचे शतक हुकले. शुबमन गिलने ९६ चेंडूंचा सामना करताना १४ चौकारांच्या मदतीने ८७ धावा केल्या. त्याचे शतक अवघ्या १३ धावांनी हुकले. तो साकीब महमूदच्या षटकात मोठा शॉट मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याचा सोपा झेल कर्णधार जोस बटलरने टिपला. तत्पूर्वी त्याने अक्षर पटेलसह चौथ्या विकेट्ससाठी शतकीय भागीदारी केली होती. या सामन्यात शुबमन गिलसह श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने अर्धशतकं झळकावली.