IND vs BAN 2nd Test 1st Day Updates: ‘माझ्या मुंबईत रस्त्यांवर खड्डे पडतात, मग ते बुजवले जातात किंवा नव्याने रस्ते बांधले जातात. पुन्हा खड्डे पडतात. खड्डे काहींसाठी फायदेशीर ठरतात’, असा टोला लिटिल मास्टर अर्थात सुनील गावस्कर यांनी लगावला आहे. भारत-बांग्लादेश कानपूर कसोटीदरम्यान गावस्कर समालोचन करत होते. त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले. मुंबईकर गावस्करांनी शहरातल्या रस्त्यांच्या स्थितीबाबत ऑन एअर असतानाच परखड भाष्य केलं आहे.

माजी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने गावस्कर भारत-बांग्लादेश चेन्नई कसोटीसाठी समालोचन कक्षात नव्हते यासंदर्भात माहिती दिली. गावस्करांची प्रकृती ठणठणीत होती पण ते एका खास निमित्तामुळे चेन्नईत नव्हते असं कार्तिकने सांगितलं. सुनील गावस्करांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस होता. यामुळेच चेन्नई कसोटीत ते समालोचन कक्षात नव्हते.

हेही वाचा – IND vs BAN: विराट कोहली २२ वर्षीय नेट बॉलरकडून सलग दोन वेळा बाद; भेदक गोलंदाजी पाहून विराटने विचारलं, “अरे तू किती…”

कानपूर कसोटीपूर्वी गावस्कर यांनी अयोध्येतल्या राम मंदिराला भेट दिली. ‘अतिशय सुरेख दर्शन झालं’, असं गावस्कर म्हणाले. शांत आणि प्रसन्न करणारं दर्शन झालं असं त्यांनी सांगितलं. याचवेळी त्यांना मुंबईतल्या खड्यांबाबत आठवण झाली. लखनौ ते अयोध्येपर्यंतचा रस्ता खूपच अप्रतिम आहे. यावेळी त्यांनी अयोध्येकडे जाणाऱ्या रस्त्यांची प्रशंसा केली. तर मुंबईच्या खड्ड्यांची आपल्याला सवय झाली आहे, असं त्यांनी म्हटलं. ‘मुंबईतील खड्ड्यांची आपल्याला सवय झाली आहे, असं वाटतं की मुंबईतील रस्ते बांधणारे दरवर्षी फायद्यामध्ये असतात. ते दरवर्षी रस्ते तयार करतात आणि दरवर्षी तिथे खड्डे पडतात, असं गावस्कर म्हणाले.

५०व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारताना ते म्हणाले, ‘खरंतर या शुभेच्छा तुम्ही माझ्या बायकोला द्यायला हव्यात कारण तिने मला ५० वर्ष सहन केलं आहे’. गावस्करांच्या या कोटीनंतर समालोचन कक्षात हास्यकल्लोळ झाला. गावस्करांच्या बरोबरीने दिनेश कार्तिक आणि बांगलादेशचे अतर अली खान समालोचन करत होते.

हेही वाचा – IND vs BAN: सरप्राईज, सरप्राईज…, आकाशदीपची भेदक गोलंदाजी अन् परफेक्ट निर्णय, रोहित शर्माही झाला अवाक्, पाहा VIDEO

भारताचे माजी कर्णधार आणि सार्वकालीन महान फलंदाजांपैकी एक असलेले गावस्कर यांनी मुंबईतल्या मैदानांवरच क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली. मुंबानगरीतल्या मैदानांवरच त्यांची बॅट पहिल्यांदा तळपली. मुंबई क्रिकेटच्या अर्ध्वयूंपैकी ते एक आहेत. मुंबई क्रिकेटचा वारसा समर्थपणे निभावत त्यांनी भारतीय संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. तंत्रशुद्ध फलंदाजीचा वस्तुपाठ असं त्यांच्या फलंदाजीचं वर्णन केलं जातं. हेल्मेटसारखी उपकरणं नसताना भंबेरी उडवणाऱ्या गोलंदाजांचा त्यांनी जिद्दीने सामना केला. धावांची टांकसाळ उघडताना त्यांनी सातत्याने शतकाची वेसही ओलांडली. कसोटी प्रकारात १०,००० पेक्षा जास्त धावा आणि ३४ शतकं त्यांच्या नावावर आहेत. खेळातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर गेली ३० हून अधिक वर्ष ते समालोचन क्षेत्रात कार्यरत आहेत. परखड भूमिका मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.