Sunil Gavaskar Statement on Rohit Sharma IND vs AUS Test Series: न्यूझीलंडविरूद्ध भारताने घरच्या मैदानावर तीन सामन्यांची कसोटी मालिका ३-० अशा फरकाने गमावली. व्हाईटवॉशनंतर भारतीय संघ आणि कर्णधार रोहित शर्मा यांना माजी खेळाडू चांगलेच खडे बोल सुनावत आहेत. भारताला न्यूझीलंडनंतर आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पण या पाचपैकी पहिल्या किंवा दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. यावर आता सुनील गावसकरांनी मोठं वक्तव्य करत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना एक सल्ला दिला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जर रोहित शर्मा एकापेक्षा जास्त कसोटी सामने खेळू शकणार नसेल त्याने संपूर्ण मालिकेत संघाचे नेतृत्व करू नये, असे मत लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. खेळाडू म्हणून दौऱ्यावर असले पाहिजे. गावस्कर यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. भारतीय कर्णधाराने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिला सामना खेळणे महत्त्वाचे आहे, यावर त्याने भर दिला.
हेही वाचा – IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं कसं असणार वेळापत्रक? भारतीय वेळेनुसार किती वाजता असणार सामना?
भारतीय कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह कर्णधार होऊ शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो उपकर्णधार होता. न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटी सामन्यानंतर रोहित शर्माला याबाबत विचारण्यात आले असता, तो म्हणाला की, याबाबत मी सध्या काही सांगू शकत नाही.
सुनील गावसकर स्पोर्ट्स तकवर म्हणाले, “पहा, कर्णधाराला पहिली कसोटी खेळणे आवश्यक आहे. त्याला दुखापत झाली असेत तर प्रश्न वेगळा आहे, पण संघाचा कर्णधार पहिल्याच सामन्यात उपलब्ध नसताना उपकर्णधारावर जो दबाव निर्माण होतो तो वेगळाच दबाव असतो. त्याला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणे सोपे जाणार नाही.”
सुनील गावसकर पुढे म्हणाले, “मलाही नक्की माहित नाही, रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार की नाही, आम्ही पण याबद्दल वाचत आहोत. मी असही वाचलं की तो कदाचित दुसऱ्या कसोटीतही खेळणार नाही. असं असेल तर अजूनही भारतीय निवड समितीकडे वेळ आहे. अजित आगरकरने त्याला सांगावं की बघ, तुला जे काही करायचे आहे, आराम कर, विश्रांती घ्या, तुमचे वैयक्तिक कारण काहीही असेल. जर तू २-३ कसोटी सामने खेळणार नसशील तर एक खेळाडू म्हणून या दौऱ्यावर जावे.”
“मग दुसऱ्या, तिसऱ्या कसोटीत कधीही संघात सामील हो. पण आम्ही या दौऱ्याचा कर्णधार बदलू आणि उपकर्णधाराला कर्णधार बनवू कारण स्पष्टता असली पाहिजे. कर्णधारपदाची जबाबदारी आहे. विशेषत: ३-० ने संघ हरला असताना या मालिकेत कर्णधाराची आवश्यकता आहे.,” असे गावसकर म्हणाले.