Sunil Gavaskar Says Team India Should Not Be Embarrassed : भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिज दौरा संमिश्र होता. कसोटी मालिका १-० ने जिंकल्यानंतर टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत यजमानांचा २-१ असा पराभव केला. मात्र, भारताला टी-२० मालिका जिंकता आली नाही. पहिले दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडिया पुनरागमन करत मालिका २-२ अशी बरोबरीत आणली, पंरतु अखेरचा सामना जिंकून वेस्ट इंडिजने ३-२ अशी मालिका जिंकली. युवा खेळाडूंनी वैयक्तिकरित्या चांगली कामगिरी केली पण टी-२० मालिकेत संघ फॉर्ममध्ये दिसला नाही. या मालिकेनंतर सुनील गावस्कर यांनी एक विधान केले आहे.
सुनील गावसकर स्पोर्टस्टारसाठी लिहीताना म्हणाले,“एखादा खेळाडू फ्रँचायझी स्तरावर चांगली कामगिरी करू शकतो, परंतु जेव्हा देशासाठी खेळण्याची वेळ येते, तेव्हा दबाव आणि अपेक्षा वाढतात. येथे सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंनाही अडचणी येतात. १९ वर्षांखालील खेळाडू वरिष्ठ संघात प्रगती करू शकत नसताना, आपण हे किती तरी वेळा पाहिले आहे. टीम इंडियासाठी तीन खेळाडूंनी टी-२० मालिकेत पदार्पण केले. यशस्वी जैस्वाल यांच्याशिवाय तिलक वर्मा आणि मुकेश कुमार यांना खेळण्याची संधी मिळाली.
युवा खेळाडूंसाठी वरिष्ठ पातळीवर गोष्टी वेगळ्या असतात – गावसकर
सुनील गावसकर म्हणाले, “मुलांना लहान मुलांविरुद्ध खेळायला आवडते. जेव्हा ते वरिष्ठ संघाविरुद्ध खेळतात, तेव्हा त्यांना अचानक लक्षात येते की, अंडर-१९ स्तरावर केकच्या तुकड्यासारखे जे दिसते ते वरिष्ठ स्तरावर वेगळे असते.” ते पुढे म्हणाले, वेस्ट इंडिजविरुद्ध टी -२० मालिका गमावणे ही भारतीय संघासाठी निराशाजनक ठरू नये. कारण कॅरेबियन खेळाडूंनी त्यांच्या इतिहासात दोनदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे.
हेही वाचा – विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा: एरिगेसीची प्रज्ञानंदवर सरशी; पहिल्या डावात कार्लसनची गुकेशवर मात
वेस्ट इंडिजकडून हरणे ही लाजिरवाणी गोष्ट नाही –
माजी खेळाडू पुढे म्हणाले, “वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवाने निराश होता कामा नये. हे विसरू नका की, त्यांनी दोनदा आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला आहे आणि त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असलेल्या विविध फ्रँचायझींचे मॅच विनर्स आहेत. म्हणूनच ते अव्वल आहेत. चांगल्या टी-२० संघाकडून पराभूत होण्यात कोणतीही लाजिरवाणी गोष्ट नाही. तथापि, भारताला आपली भूमिका मजबूत करण्यासाठी कोणत्या क्षेत्रात सुधारणा करणे आवश्यक आहे. याचा हा इशारा असू शकतो.”