दक्षिण आफ्रिका टी-२० लीगचा पहिला हंगाम सनरायझर्स इस्टर्न कॅपने जिंकला आहे. अंतिम सामन्यात सनरायझर्स इस्टर्न कॅपने प्रिटोरिया कॅपिटल्सचा ४ गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिका टी-२० लीगच्या पहिल्या हंगामाचा मालिकावीर पुरस्कार सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामला देण्यात आला. त्याचवेळी, अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या रोलोफ व्हॅन डर मर्वेला सामनावीराचा किताब देण्यात आला.
पावसामुळे राखीव दिवशी खेळल्या गेलेल्या SA20 लीगच्या अंतिम सामन्यात सनरायझर्स इस्टर्न कॅप आणि प्रिटोरिया कॅपिटल्स आमनेसामने होते. या सामन्यात कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सनरायझर्सने १९.३ षटकांत प्रिटोरिया कॅपिटल्सला १३५ धावांत गुंडाळले. प्रिटोरिया कॅपिटल्सकडून ६ फलंदाजांना चांगली सुरुवात केली, पण त्यांना मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतरित करता आले नाही.
केवळ एक फलंदाज कुसल मेंडिस २१ धावा करू शकला. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावाही करता आल्या नाहीत.सनरायझर्स इस्टर्न केपकडून व्हॅन डर मर्वेने ४ विकेट घेतल्या, तर सिसांडा मॅगाला आणि ओटनील बार्टमन यांनी २-२ विकेट घेतल्या. कर्णधार इडन मार्कराम आणि मार्को जॅनसेन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
१३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स इस्टर्न केपची सुरुवात चांगली झाली नाही. पण अॅडम रॉसिंग्टन आणि जॉर्डन हरमन यांनी ६१ धावांची भागीदारी केली. हरमन २२ धावांवर बाद झाला, तर कर्णधार एडन मार्करामने २६ धावांची खेळी खेळली. अॅडम रॉसिंग्टनने ३० चेंडूत ५७ धावा करत प्रिटोरिया कॅपिटल्सचा धुव्वा उडवला. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ५ षटकार लगावले. प्रिटोरिया कॅपिटल्सकडून एनरिक नॉर्टजेने २ विकेट घेतल्या.
विजेत्या संघाला मिळाले करोडो रुपये –
दक्षिण आफ्रिका टी-२० लीगचा पहिला हंगाम जिंकणाऱ्या संघाला रक्कम ७० दशलक्ष रँड बक्षीस होते, याचा अर्थ सनरायझर्स इस्टर्न कॅपला सुमारे ३३.५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० फ्रँचायझी इतिहासातील ही सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे.
सनरायझर्स इस्टर्न कॅप कर्णधार एडन मार्करामही चांगला मालामाल झाला.
हेही वाचा – WPL Auction 2023: महिला प्रीमियर लीग लिलावात एक महिला असणार लिलावकर्ता! जाणून घ्या कोण आहे ‘ती’ महिला?
कारण तो या स्पर्धेचा मॅन ऑफ द सीरीज ठरला आहे. मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार जिंकणाऱ्या एडन मार्करामच्या बक्षीस रकमेबद्दल सांगायचे तर, त्याला दक्षिण आफ्रिकेच्या चलनात ३५०,००० रँड म्हणजेच भारतीय चलनात सुमारे १६ लाख, १३ हजार, ५४५ रुपये बक्षीस रक्कम देण्यात आली आहे.