गुजरात लायन्सवर पाच विकेट्सने मात, धवनची विजयी खेळी
युवा गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि मिस्ताफिझूर रेहमानची भेदक गोलंदाजी तसेच सलामीवीर शिखर धवनच्या संयमी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने गुजरात लायन्सवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातला हैदराबादने अवघ्या १२६ धावांमध्ये रोखले. पण हे माफक आव्हान पूर्ण करण्यासाठी हैदराबादला पाच फलंदाज गमवावे लागले. पण धवनने अखेपर्यंत खेळपट्टीवर टिकाव धरत संघाचा विजय सुकर केला. हैदराबादचा हा सलग दुसरा विजय ठरला असून गुजरातला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला.
हैदराबादने नाणेफेक जिंकत गुजरातला फलंदाजीला पाचारण करत त्यांची ४ बाद ३४ अशी दयनीय अवस्था केली. यावेळी गुजरातचा संघ शतकाची वेस ओलांडेल, असे वाटत नव्हते. पण आरोन फिंच यावेळी गुजरातसाठी धावून आला. फिंचने तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५१ धावांची दमदार खेळी साकारली, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. फिंचच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातला १२६ धावा करता आल्या. हैदराबादकडून बांगलादेशच्या मुस्ताफिझूर रेहमानने भेदक मारा करत १७ धावांमध्ये दोन बळी मिळवले, भुवनेश्वर कुमारनेही दोन बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली.
गुजरातच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (२४) संघाला जलदगतीने सुरुवात करून दिली. पण वॉर्नर बाद झाल्यावर मात्र हैदराबादचा डाव घसरायला सुरुवात झाली. या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या युवराज सिंगकडून साऱ्यांनाच मोठय़ा अपेक्षा होत्या, पण युवराजला १४ चेंडूंमध्ये फक्त पाच धावाच करता आल्या. एका बाजूने ठराविक फरकाने फलंदाज बाद होत असताना धवनने एक बाजू लावून धरली होती. धवनने सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ४७ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
गुजरात लायन्स : २० षटकांत ६ बाद १२६ (आरोन फिंच नाबाद ५१, सुरेश रैना २०; मुस्ताफिझूर रेहमान २/१७, भुवनेश्वर कुमार २/२८) पराभूत वि. सनरायझर्स हैदराबाद : १९ षटकांत ५ बाद १२९ (शिखर धवन नाबाद ४७; ड्वेन ब्राव्हो २/१४, धवल कुलकर्णी २/१७).
सामनावीर : भुवनेश्वर कुमार