* गुजरात लायन्सवर दहा विकेट्सनी मात * भुवनेश्वर कुमारचा भेदक मारा * वॉर्नरचे झंझावाती अर्धशतक
सर्वागीण दिमाखदार प्रदर्शनाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत गुजरात लायन्सवर दहा विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी आणि विजय पक्का हे समीकरण या सामन्यातही कायम राहिले. हैदराबादने गुजरात लायन्सला १३५ धावांतच रोखले. डेव्हिड वॉर्नर व शिखर धवनच्या दिमाखदार खेळींच्या जोरावर त्यांनी पाच षटके राखून सहज विजय साकारला. स्विंग गोलंदाजीचा उत्कृष्ट नमुना सादर करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने नेहमीच्याच आक्रमक शैलीत सुरुवात केली. वॉर्नरच्या मुक्त फटकेबाजीमुळे धावांसाठी झगडणाऱ्या शिखर धवनला खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ मिळाला. प्रवीण तांबेच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत वॉर्नरने अर्धशतक पूर्ण केले. वॉर्नरकडून प्रेरणा घेत धवननेही टोलेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या जोडीने १३७ धावांच्या नाबाद सलामीसह मिळवून दिलेल्या विजयामुळे हैदराबाद संघाची सरासरी धावगतीही वधारली आहे. वॉर्नरने ९ चौकारांसह ४८ चेंडूत ७४ तर धवनने ५ चौकारांसह ४१ चेंडूत ५३ धावांची खेळी साकारली.
तत्पूर्वी, सुरेश रैनाच्या झुंजार खेळीनंतरही गुजरात लायन्स संघाला १३५ धावांचीच मजल मारता आली. यंदाच्या स्पर्धेत तीन सामनावीर पुरस्कार पटकावणाऱ्या आरोन फिंचला भुवनेश्वर कुमारने भोपळाही फोडू दिला नाही. ब्रेंडन मॅक्क्युलम आणि सुरेश रैना यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. मात्र असमान उसळी मिळणारी खेळपट्टी आणि स्विंग होणारे चेंडू यामुळे हे दोघेही चाचपडत खेळत होते. बिपुल शर्माला मोठा फटका मारण्याचा मॅक्क्युलमचा प्रयत्न दीपक हुडाच्या हातात विसावला. त्याने १८ धावा केल्या. यानंतर लायन्सच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. दिनेश कार्तिक (८), ड्वेन ब्राव्हो (८), रवींद्र जडेजा (१४) यांना झटपट बाद करत हैदराबादने लायन्सच्या धावगतीला वेसण घातली. सातत्याने सहकारी बाद होत असतानाही रैनाने खेळपट्टीवर नांगर टाकत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. रैनाने ५१ चेंडूंत ९ चौकारांसह ७५ धावांची खेळी केली. या हंगामातील रैनाचे हे पहिलेच अर्धशतक आहे. लायन्सच्या सहा फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. हैदराबादतर्फे भुवनेश्वर कुमारने २९ धावांत ४ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
गुजरात लायन्स : २० षटकांत ८ बाद १३५ (सुरेश रैना ७५; भुवनेश्वर कुमार ४/२९) पराभूत विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद : १४.५ षटकांत बिनबाद १३७ (डेव्हिड वॉर्नर ७४, शिखर धवन ५३)
सामनावीर : भुवनेश्वर कुमार