सनरायजर्स हैदराबादचा संघ पहिल्या लढतीत अपेक्षेप्रमाणे तळपण्यात अपयशी ठरला. परंतु शारजा क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएलमधील दुसऱ्या लढतीत त्यांच्यापुढे खडतर काम असेल. कारण समोर आव्हान असेल ते पहिले दोन्ही सामने जिंकून विजयी आवेशात मार्गक्रमण करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे.
शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत हैदराबादने १३३ धावांचे लक्ष्य उभारले होते. परंतु जेम्स फॉल्कनरने दोन चेंडूंवर दोन चौकार ठोकून अखेरच्या षटकात राजस्थानला शानदार विजय मिळवून दिला. हैदराबादच्या संघाने या सामन्यात मोठी धावसंख्या उभारली नव्हती. कर्णधार शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पायाउभारणी केल्यावर ते तंबूत परतले. परंतु किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना करताना झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न करण्याची खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आहे.
पंजाबच्या संघाची सध्याची घोडदौड पाहता त्यांना कोणतेही अवघड लक्ष्य गाठणे सोपे नाही. चेन्नई सुपर किंग्जचे आणि राजस्थान रॉयल्सचे अनुक्रमे २०५ आणि १९१ धावांचे आव्हान त्यांनी सहजगत्या पेलले होते. पंजाबच्या संघाची मदार आहे ती ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर या दोन स्फोटक फलंदाजांवर.
आयपीएलच्या सातव्या मोसमात मॅक्सवेलने प्रारंभापासून आपली छाप पाडायला सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात ४३ चेंडूंत ९५ धावा आणि दुसऱ्या सामन्यात ४५ चेंडूंत ८९ धावा काढून मॅक्सवेलने सर्वाना धोक्याचा इशारा दिला आहे. मिलरही तुफानी फॉर्मात आहे. त्याने अनुक्रमे दोन सामन्यांत ३७ चेंडूंत ५४ धावा आणि १९ चेंडूंत ५१ धावा केल्या आहेत.
दुसरीकडे हैदराबाद संघाची मदार आहे ती डेल स्टेन, इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार या वेगवान त्रिकुटावर. मॅक्सवेल आणि मिलरला वेसण घालण्यासाठी या अस्त्रांचा कशा प्रकारे वापर करावा, ही जबाबदारी कर्णधार शिखर धवनवर असेल. हैदराबादच्या फिरकीची धुरा लेग-स्पिनर अमित मिश्रा आणि मिरतचा कर्ण शर्मा समर्थपणे सांभाळत आहेत.

संघ
किंग्ज इलेव्हन पंजाब : जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड मिलर, मनन व्होरा, वीरेंद्र सेहवाग, मिचेल जॉन्सन, चेतेश्वर पुजारा, शॉन मार्श, वृद्धिमान साहा, थिसारा परेरा, ग्लेन मॅक्सवेल, रिशी धवन, अनुरित सिंग, संदीप शर्मा, अक्षर पटेल, ब्युरान हेंड्रिक्स, करणवीर सिंग, मुरली कार्तिक, शिवम शर्मा, शार्दूल ठाकूर, लक्ष्मीपती बालाजी, परविंदर अवाना, गुरकिराटसिंग मान, मनदीप सिंग.
सनराजर्स हैदराबाद : शिखर धवन (कर्णधार), डेल स्टेन, डेव्हिड वॉर्नर, डॅरेन सॅमी, अमित मिश्रा, आरोन फिंच, इरफान पठाण, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, ब्रेन्डन टेलर, मोझेस हेन्रिक्स, वेणुगोपाल राव, जेसन होल्डर, एस. अनिरुद्ध, मनप्रीत जुनैजा, के. एल. राहुल, अमित पाऊनिकर, नमन ओझा, रिकी भुई, आशीष रेड्डी, चामा मिलिंद, परवेझ रसूल, प्रशांत परमेश्वरन आणि करण शर्मा.
आजचे सामने  :  सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब,  
वेळ : रात्री ८ वा.     
स्थळ : शारजा   
थेट प्रक्षेपण : सोनी मॅक्स, सोनी सिक्स