गेल्या वर्षी ‘स्पॉट-फिक्सिंग’चा ठपका बसलेला राजस्थान रॉयल्सचा संघ नव्या कर्णधारासह नव्याने स्पर्धा खेळण्यासाठी उतरत असून हे नवे गडी नवे राज्य स्थापणार का, याकडेच साऱ्यांचे लक्ष असेल. तर दुसरीकडे शिखर धवनचा सनराजर्स हैदराबादचा संघ तळपण्यासाठी सज्ज आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात विजयानिशी सुरुवात करण्यासाठी राजस्थान आणि हैदराबाद हे दोन्ही संघ आतुर असतील.
एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना गेल्या वर्षीच ‘स्पॉट-फिक्सिंग’च्या आरोपांमुळे संघातून बडतर्फ करण्यात आले होते. त्याचबरोबर माजी कर्णधार राहुल द्रविडनेही गेल्या हंगामात निवृत्ती पत्करल्याने तोही संघात नसेल. त्यामुळे संघाचा नवीन कर्णधार शेन वॉटसनवर मोठी जबाबदारी असेल. राजस्थानला या वेळी अजिंक्य रहाणेकडून मोठी अपेक्षा असेल. फलंदाजीमध्ये अजिंक्य आणि वॉटसनबरोबर ब्रॅड हॉज, संजू सॅमसन, स्टुअर्ट बिन्नी, जेम्स फॉल्कनर यांच्याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. गोलंदाजीमध्ये ४२ वर्षीय प्रवीण तांबे पुन्हा आपली चमक दाखवेल का, याबाबत उत्सुकता असेल.
पहिल्याच मोसमात हैदराबादने चौथा क्रमांक मिळवला होता, या वेळी शिखर धवनकडे कर्णधारपद असल्याने संघाच्या प्रगतीचा आलेख किती चढतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. फलंदाजीमध्ये शिखर, डेव्हिड वॉर्नर आणि वेणुगोपाल राव हे नावाजलेले फलंदाज आहेत. पण हैदराबादचा संघ फलंदाजीपेक्षा गोलंदाजीवर अधिकाधिक सामने जिंकू शकतो. कारण त्यांच्याकडे डेल स्टेनसारखा तोफखाना आहे, इरफान पठाण, भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा स्टेनला साथ देतील. सध्या फॉर्मात असलेला अमित मिश्रा आणि स्थानिक खेळाडूंमध्ये सर्वाधिक बोली पटकावणारा करण शर्मा हैदराबादच्या ताफ्यात आहेत.

प्रतिस्पर्धी संघ
राजस्थान रॉयल्स : शेन वॉटसन (कर्णधार), अजिंक्य रहाणे, जेम्स फॉल्कनर, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, ब्रॅड हॉज, स्टिव्हन स्मिथ, अभिषेक नायर, बेन कटिंग, केन रिचर्ड्सन, टिम साऊथी, उन्मुक्त चंद, अंकुश बैन्स, विक्रमजीत मलिक, राहुल टेवाटिया, अंकित शर्मा, अमित मिश्रा (कनिष्ठ), दीपक हुडा, रजत भाटिया, केव्हॉन कुपर, इक्बाल अब्दुल्ला, धवल कुलकर्णी, प्रवीण तांबे, करुण नायर आणि दिशांत याग्निक.
सनराजर्स हैदराबाद : शिखर धवन (कर्णधार), डेल स्टेन, डेव्हिड वॉर्नर, डॅरेन सॅमी, अमित मिश्रा, आरोन फिंच, इरफान पठाण, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, ब्रेन्डन टेलर, मोझेस हेन्रिक्स, वेणुगोपाल राव, जेसन होल्डर, एस. अनिरुद्ध, मनप्रीत जुनैजा, के. एल. राहुल, अमित पाऊनिकर, नमन ओझा, रिकी भुई, आशीष रेड्डी, चामा मिलिंद, परवेझ रसूल, प्रशांत परमेश्वरन आणि करण शर्मा.

Story img Loader