IPL Acution 2024: आयपीएल स्पर्धेसाठीचा लिलाव काही दिवसांपूर्वी दुबईत आयोजित करण्यात आला होता. या लिलावात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीच्या जोडगोळीने विक्रमी कमाई केली. या दोघांसह अनेक खेळाडूंसाठी कोटीच्या कोटी उड्डाणं बोली लावण्यात आली. लिलावानंतर प्रत्येक संघाचं चित्र स्पष्ट झालं आणि असंख्य गमतीजमती समोर आल्या आहेत.
लिलावानंतर मात्र सनरायझर्सने कर्णधाराची स्थिती केविलवाणी केली आहे. लिलावात सनरायझर्स संघव्यवस्थापनाने तब्बल २० कोटी ५० लाख रुपये खर्चून ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकपविजेता कर्णधार पॅट कमिन्सला ताफ्यात दाखल करुन घेतलं. कमिन्सच्या नेतृत्वातच ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, अॅशेस, वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. कर्णधार म्हणून त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. गोलंदाज म्हणूनही त्याने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. कमिन्ससाठी हैदराबादने निम्मी पाऊण तिजोरी खर्च केली. कमिन्स सनरायझर्सचा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू असणार आहे. सनरायझर्सचा कर्णधार एडन मारक्रमला २ कोटी ६० लाख रुपये मानधन मिळतं. कर्णधाराच्या तुलनेत कमिन्सला १० पट मानधन मिळणार आहे. कमिन्स ऑस्ट्रेलियासाठी टेस्ट आणि वनडे अशा दोन प्रकारात खेळतो. वेगवान गोलंदाज असल्याने त्याला दुखापती होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कमिन्ससाठी वर्कलोड मॅनेजमेंट हा मुद्दा कळीचा ठरतो. खर्च केलेली रक्कम पाहता सनरायझर्स कमिन्सची कर्णधार म्हणून नियुक्ती करु शकतं. पण तो सगळे सामने खेळू शकेलच असं नाही. तूर्तास तरी सनरायझर्स कर्णधारपदाबाबत घोषणा केलेली नाही. मानधन यादीनुसार कमिन्स आणि मारक्रम यांच्यादरम्यान ११ खेळाडू आहेत. सोप्या शब्दात सांगायचं तर अंतिम अकरातील सहकाऱ्यांपेक्षा कमी मानधन कर्णधाराला मिळणार आहे. जेतेपदं आणि डावपेच-धोरणं या आघाड्यांवर सनरायझर्स पिछाडीवर का? याचं उत्तर या कोष्टकात आहे.
२०१५ ते २०२१ या कालावधीसाठी डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता. युवा भारतीय खेळाडूंसाठी वॉर्नरचा अनुभव मोलाचा ठरला. आंतरराष्ट्रीय अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडू यांची मोट बांधत वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्सने २०१६ मध्ये जेतेपदावर नाव कोरलं. सनरायझर्स आणि वॉर्नर हे नातं घट्ट झालं. हैदराबादमध्ये आणि एकूणच देशभरात वॉर्नरचे प्रचंड चाहते आहेत. दाक्षिणात्य चित्रपटातील गाण्यांवर वॉर्नर आपल्या लेकींसह रील्स करतो. २०२१ नंतर मात्र वॉर्नर आणि सनरायझर्स यांच्यात बिनसलं. वॉर्नरला आधी कर्णधारपदावरून, मग संघातून वगळण्यात आलं. दुबईत एका सामन्यावेळी तर वॉर्नरला मैदानातही येऊ देण्यात आलं नाही. अखेर सनरायझर्सने वॉर्नरला निरोप दिला. वॉर्नर बाजूला झाल्यानंतर केन विल्यमसनने नेतृत्वाची धुरा सांभाळली. केनचा शांत संयमी स्वभाव आणि फलंदाजी हे सनरायझर्ससाठी आश्वासक होतं पण त्यांनी त्याला रिटेन केलं नाही. वॉर्नर-केन दोघेही नसल्यामुळे सनरायझर्सची कमान कोण सांभाळणार असं प्रश्नचिन्ह होतं. दक्षिण आफ्रिकेचं कर्णधारपद भूषवलेल्या एडन मारक्रमकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. १३ सामन्यात एडनने नेतृत्वाची कमान सांभाळली.
विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं कर्णधारपद सोडल्यानंतर फाफ डू प्लेसिस नेतृत्वाची धुरा सांभाळतो आहे. फाफचं मानधन ७ कोटी आहे. फाफ डू प्लेसिसपेक्षा जास्त मानधन ग्लेन मॅक्सवेल (११ कोटी), अल्झारी जोसेफ (११ कोटी ५० लाख), विराट कोहली (१७ कोटी), कॅमेरुन ग्रीन (१७ कोटी ५० लाख) या चौकडीला मिळणार आहे. कोहली हा आयपीएल सर्वाधिक धावा नावावर असणारा फलंदाज आहे. स्पर्धेत सर्वाधिक शतकंही त्याच्या नावावर आहेत. कोहलीप्रमाणेच ग्लेन मॅक्सवेलनेही आपलं कर्तृत्व वेळोवेळी सिद्ध केलं आहे. वेस्ट इंडिजचा युवा गोलंदाज अल्झारी जोसेफ याच्यासाठी बंगळुरूने प्रचंड रक्कम खर्च केली. बंगळुरूच्या छोट्या मैदानावर धावा रोखणं आणि विकेट्स पटकावणं अशी दुहेरी जबाबदारी अल्झारीच्या खांद्यांवर आहे. मुंबईकडून ट्रेडऑफ झालेल्या कॅमेरुन ग्रीनला बंगळुरूचा संघ तब्बल १७ कोटी ५० लाख रुपये देणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलचाही मर्यादित अनुभव असलेला ग्रीन बंगळुरूचा सर्वाधिक पगारदार असणार आहे. त्याची प्रत्येक धाव, झेल आणि विकेट याकडे चाहत्यांचं लक्ष असेल.
पंजाब किंग्जची स्थितीही फारशी वेगळी नाही. डावुखरा आक्रमक फलंदाज शिखर धवन पंजाबचा कर्णधार आहे. धवनचं मानधन ८ कोटी २५ लाख आहे. १८ कोटी ५० लाखांसह सॅम करन पंजाबचा सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे. करनला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तरी करनला पंजाबने रिलीज केलं नाही. लिलावात पंजाबने हर्षल पटेलसाठी ११ कोटी ७५ लाख खर्च केले. लायम लिव्हिंगस्टोनचं मानधन ११ कोटी ५० लाख आहे. भेदक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध कागिसो रबाडा याचं मानधन ९ कोटी २५ लाख आहे. मानधन यादीनुसार धवनचा क्रमांक पाचवा आहे.
कोलकाताने लिलावात कहर करत मिचेल स्टार्कसाठी तब्बल २४ कोटी ७५ लाख रुपये मोजले. श्रेयस अय्यर कोलकाताचा कर्णधार आहे. त्याचं मानधन आहे १२ कोटी २५ लाख. कर्णधार श्रेयसच्या तुलनेत स्टार्कचा पगार दुपटीपेक्षाही जास्त आहे. या दोघांच्या दरम्यान आंद्रे रसेल आहे. त्याचं मानधन १६ कोटी रुपये आहे. स्टार्क आणि रसेल दोघांनाही कारकीर्दीत दुखापतींनी सतावलं आहे. एवढी प्रचंड रक्कम दिल्यानंतरही हे दोघे हंगामातील सगळे सामने खेळू शकतील का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. आयपीएलनंतर ट्वेन्टी२० वर्ल्डकप होणार आहे.
महेंद्रसिंग धोनीने मानधन कमी घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार त्याचं मानधन १२ कोटी रुपये आहे. चेन्नईसाठी सर्वाधिक पगारदार खेळाडू रवींद्र जडेजा आहे. जडेजाचं मानधन १६ कोटी आहे. बेन स्टोक्सला पर्याय म्हणून ताफ्यात समाविष्ट केलेल्या डॅरेल मिचेलसाठी चेन्नईने १४ कोटी रुपये खर्च केले. स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध दीपक चहरचं मानधनही १४ कोटी आहे. हे तिघे मानधनाच्या बाबतीत धोनीच्या पुढे आहेत. याहून गंमत म्हणजे मानधन यादीत धोनीखालोखाल युवा समीर रिझवीचं नाव आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तडाखेबंद फलंदाजीने सगळ्यांवर छाप उमटवणाऱ्या समीरसाठी चेन्नईने ८ कोटी ४० लाख खर्च केली. मोईन अली, ऋतुराज गायकवाड, शार्दूल ठाकूर, मिचेल सँटनर, अजिंक्य रहाणे यांच्यापेक्षाही समीर रिझवीला मानधन मिळणार आहे.
हार्दिकला ट्रेडऑफ केल्यानंतर गुजरात टायटन्सने युवा शुबमन गिलकडे संघाची कमान सोपवली आहे. गिलचं मानधन ८ कोटी रुपये आहे. गुजरातसाठी सर्वाधिक मानधन रशीद खानच्या नावावर आहे. त्याला १५ कोटी रुपये मिळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तुटपुंजा अनुभव असलेल्या स्पेन्सर जॉन्सनसाठी गुजरातने १० कोटी रुपये खर्चत सगळ्यांना धक्का दिला. अष्टपैलू राहुल टेवाटियाला ९ कोटी रुपये मानधन मिळतं. मानधन यादीनुसार या तिघांनंतर गिलचा क्रमांक आहे.
मुंबई इंडियन्सने काही दिवसांपूर्वीच हार्दिक पंड्या नवीन कर्णधार असेल असं घोषित केलं. हार्दिकचं मानधन १५ कोटी रुपये आहे. मुंबईला पाच जेतेपदं जिंकून देणाऱ्या रोहित शर्माचं मानधन १६ कोटी रुपये आहे. स्फोटक खेळींसाठी प्रसिद्ध विकेटकीपर फलंदाज इशान किशनचं मानधन १५ कोटी २५ लाख रुपये आहे. या दोघांनंतर हार्दिकचा क्रमांक आहे.
राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपरजायंट्स या संघांनी मात्र पारंपरिक रचनाच स्वीकारली आहे. संजू सॅमसन, ऋषभ पंत आणि के.एल.राहुल हे आपापल्या संघांसाठी सर्वाधिक मानधन घेणारे खेळाडू आहेत.