* दिल्ली डेअरडेव्हिल्स नॉक आऊट
* डॅरेन सॅमीची अष्टपैलू कामगिरी
सनरायजर्स हैदराबादच्या डॅरेन सॅमीच्या अष्टपैलू खेळाने उप्पलचे राजीव गांधी स्टेडियम उजळले. त्या बळावर हैदराबादने ६ विकेट आणि ३७ चेंडू राखून दुबळ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सवर आरामात विजय मिळवला. हैदराबाद घरच्या मैदानावर सलग पाचव्या विजयाची नोंद करीत आयपीएल क्रिकेट स्पध्रेच्या गुणतालिकेत आता तिसऱ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. त्यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ११ सामन्यांमध्ये दिल्लीला ३ विजय आणि ८ पराजय पदरी पडले. त्यांच्या खात्यावर आता फक्त ६ गुण जमा आहेत.
हैदराबादकडून पार्थिव पटेल (१४) आणि शिखर धवन (२२) यांनी ३३ धावांची दमदार सलामी नोंदवली. पण त्यानंतर जोहान बोथाने दोन बळी घेत हैदराबादला हादरविले. परंतु डॅरेन सॅमीने नाबाद १८ धावा काढत संघाला विजयापर्यंत सुखरूप पोहोचवले.
त्याआधी, सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजीचा प्रत्यय घडवत दिल्ली डेअरडेव्हिल्सचा डाव फक्त ८० धावांत गुंडाळला. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघनायक महेला जयवर्धनेने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. आयपीएलच्या सहाव्या हंगामातील निचांकी धावसंख्या दिल्लीने शनिवारी नोंदवली. गेल्याच महिन्यात फिरोझशाह कोटला मैदानावर चेन्नई सुपर किंग्जने दिल्लीचा फक्त १०० धावांत खुर्दा केला होता.
डेल स्टेन, थिसारा परेरा आणि डॅरेन सॅमी या गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर इशांत शर्मा, करण शर्मा आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला. उन्मुक्त चंदने सर्वाधिक १७ धावा केल्या, तर इरफान पठाणने १३ धावा केल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा